ठाणे : ज्यांनी कोठारी बंधुंना शहीद केलं, ज्यांनी रामाला नाकारलं त्यांच्या मांडिला-मांडी लावून ते बसले आहेत. मंथरेचं ऐकलं तर काय होतं हे माहिती आहे. उद्धव ठाकरेंसोबत एक मंथरा आहे, असं म्हणत फडणवीसांनी निशाणा साधला.
ठाणे शहरात कारसेवकांचा सत्कार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरजार हल्लाबोल केला. ते पुढे बोलताना म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वाघ होते. पण, ठाकरे गटामध्ये कोणीही वाघ नाही. एक नेता दाखवा ज्याने राम मंदिरासाठी काम केलं आहे. ढाचा पाडताना उपस्थित असलेला एक नेता मला दाखवा. आमच्याकडे अनेक नेते होते. लालकृष्ण अडवाणी होते, मुरली मनोहर जोशी होते. आमचे सगळे नेते कारसेवेमध्ये होते, असं म्हणत त्यांनी टीका केली.
रक्तारक्तात हिंदूत्व आहे – फडणवीस
उद्धव ठाकरेंचं वय होतं कारसेवा करायचं. पण, तुम्ही निसर्गाची फोटोग्राफी करत होता. कारसेवक लाठी-गोळ्या खात होते. त्यावेळी तुम्ही फोटो काढत होते. खरे वाघ बाबरीवर चढून कोठारी बंधुच्या रुपाने छातीवर गोळी खात होते, लाठ्या खात होते. तुम्ही आम्हाला काय सांगणार कारसेवा, असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला.
मी देखील कारसेवक होतो हे गर्वाने सांगतो. मी विसाव्या वर्षी कारसेवेला गेलो होतो. राम मंदिर निर्माण झालं म्हणजे सरकार पण येणार. माझ्या वजनाने बाबरी पडली म्हणतात, बाबरी तर खूप छोटी गोष्ट आहे, हिमालय देखील हलवण्याची आमच्यात ताकद आहे. कारसेवकात ही ताकद आहे. राजकीय हिंदूंनी आम्हाला हिंदूत्व सांगू नका, आमच्या रक्तारक्तात हिंदूत्व आहे, असं फडणवीस म्हणाले.
बाबरी मशिद हे एका काट्याप्रमाणे टोचत होतं. गुलामगिरी, कलंकाचा ढाचा पाडून त्याच दिवशी राम लल्ला तेथे ठेवण्यात आले होते. पण, मंदिर छोटं होतं. आंदोलन संपलं नव्हतं. पण, आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राम लल्ला त्यांच्या मूळ जागी विराजमान होत आहेत. भारताची ही नवी अस्मिता, नवी सुरुवात होत आहे. पण, काही लोक राम मंदिराचा बहिष्कार टाकत आहेत, असं म्हणत त्यांनी टीका केली.