हिंदूंनी हिंदू म्हणून एकत्र येणे ही काळाची गरज आहे. मोर्चाच्या निमित्ताने का होईना, हिंदूंनी एकत्र येत राहणे आवश्यक आहे. काळ बदलतो आहे तसे हिंदूंसमोरील प्रश्नही बदलत आहेत.
‘सकल हिंदू समाज’ अशा व्यापक शीर्षकाखाली हिंदूंचा मोर्चा मुंबईत पार पडला. हा पहिला मोर्चा नाही आणि शेवटचाही असणार नाही. शांततामय वातावरणात पार पडलेल्या सकल मराठा मोर्चानंतर आपल्याकडे अशा प्रकारे मोर्चा निघू शकतो, हे यावरुन पुनश्च अधोरेखित झाले. समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चाचे माध्यम लोकशाहीला नवे नाही. मात्र, सकल हिंदू समाजाचा मोर्चा मात्र सगळ्याच समाजाला नव्याने विचार करायला लावणारा आहे.
केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. हे सरकार पक्के हिंदुत्ववादी आहे. हिंदूंच्या आशाआकांक्षांची जाण ठेवणारे आहे. राम मंदिर असो, काशिविश्वेश्वराच्या मंदिरांचा कायापालट असो, गंगेच्या आरतीला राष्ट्रीय अधिष्ठान देण्याचे पंतप्रधान मोदींचे वर्तन असो, हिंदूंच्या भावनांची दखल घेणारे सरकार आज देशात कार्यरत आहे. मग या मोर्चांची गरज काय, असा प्रश्न सहज उपस्थित होऊ शकतो. हा प्रश्न सहज असला तरी त्याला उत्तर नाही. याचे कारण हिंदू समाजाचे म्हणून काही प्रश्न आहेत. हे प्रश्न अस्तित्वाचे आहेत.
जर हिंदू समाज सुरक्षित राहिला, तर असे सरकारही सुरक्षित राहील. हिंदू समाजाच्या मानसिक सुरक्षेचे म्हणूनही काही प्रश्न आहेत. एखादा समाज जेव्हा एकवटतो, तेव्हा त्याची शक्ती एकीमुळे दुणावते. हा काही पहिला मोर्चा नाही. सांगली, पुणे, पेण अशा ठिकाणी यापूर्वी हे मार्चे निघाले आहेत. शांततापूर्ण मार्गाने आपली क्षमता व ताकद दाखवित हे मोर्चे निघत असतात. हिंदूना हिंदू म्हणून रस्त्यावर उतरण्याची सवय नाही. ही सवय या मोर्चातून विकसित होत आहे.
हिंदू सनदशील आहे. राज्यघटनेची अंमलबजावणी या देशात सुखासुखी होत असते. कारण, इथला बहुसंख्य समाज हिंदू आहे. हिंदूंच्या भावनांची कदर न करणारे सरकार हा हिंदूंसमोरील मोठा प्रश्न होता. हिंदूंनीच तो मतपेढीच्या मार्गाने सोडविला. मात्र, राजकीय प्रश्न हा हिंदूंच्या समोरील एकमेव प्रश्न नाही. हिंदूंच्या अस्मितेचे म्हणून अनेक प्रश्न आहेत. बदलत्या काळानुसार हिंदूंसमोरील प्रश्नही बदलत आहेत. अशा प्रकारच्या मोर्चाचे आयोजन करण्याची प्रेरणा हीदेखील समकालीन प्रश्नांच्या उत्तरांची शोधप्रक्रियाच मानावी लागेल. श्रद्धा वालकर प्रकरणानंतर ही भावना देशभर उसळून आली. हिंदुत्ववादी संघटनांच्या अभिव्यक्ती या वास्तव नसून तो कांगावा आहे, असा समज सर्वदूर पोहोचवणारी एक जमात डाव्या विचारवंतांनी रूजविली आहे. अल्पसंख्याकांच्या रक्षणार्थ ही मंडळी पुढे येत असतात.
मात्र, अशांच्या दाव्याच्या फुग्यांना टाचण्या लावण्याचे काम आफताबसारखे लोक करीत असतात. श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे केल्यानंतर सामोर्या गेलेल्या ‘नार्को टेस्ट’मध्ये आफताबसारखा मुलगा जन्नतमध्ये मिळणार्या पर्यांचा उल्लेख करतो. आधुनिक शिक्षण, सामाजिक सुधारणांचा पूर्ण फायदा उचलायचा, मनाने मात्र समाजापेक्षा आपलेच धर्मवेडेपण जपणार्या एका लोकसमूहाबरोबर हिंदू समाजाला जगायचे आहे. सकल हिंदू मोर्चाच्या निमित्ताने हिंदू समाज म्हणून एकत्र येऊन अशा संकटांची चाचपणी करायची संधी मिळत असेल, तर तो लोकशाहीतला त्यांचा अधिकार मानावा लागेल.
हिंदूंसमोरच्या प्रश्नांची यादी मोठी आहे. सरकारवर अवलंबून न राहाता सर्वांत आधी या प्रश्नांची ओळख करून घेणे हिंदू म्हणून गरजेचे आहे. ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे समोर यायला लागली, त्यावेळी हा कांगावा असल्याचा दावा अनेकांनी केला होता. मात्र, इथे अनेक ‘आफताब’ निघाले आणि काळी कृत्येच इतकी निर्घृण होती की, आतून कितीही वाटत असले तरी त्यांची बाजू कोणीही घेऊ शकले नाही, असाच मुद्दा आहे. ‘लॅण्ड जिहाद’चा हिंदूंच्या जागा दबावाने, धाकाने आणि आपल्या धर्माचे वातावरण निर्माण करून जागा बळकावण्याचे उद्योग सुरूच आहेत. काश्मीर खोर्यात जे झाले, त्याच्या या लघु किंवा सूक्ष्म आवृत्त्या आहेत.मुंबईच्या उत्साही गणेशोत्सवानंतर निघणार्या विसर्जनाच्या मिरवणुकी काही लोकांना उन्मादी वाटतात.
मात्र, गिरणगावातून गिरगाव चौपाटीला नेल्या जाणार्या बाप्पाच्या मिरवणुकांचा इतिहास ज्यांना ठाऊक नाही, त्यांनी तो जाणून घ्यावा. ‘आम्ही हिंदू नाही’ असे सांगणार्या लहान-मोठ्या जातींचे समूह आणि त्यांना त्यांच्या मूळ प्रवाहापासून दूर नेण्याचे प्रयत्न करणारे करंटे हे देखील आज मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत. निसर्गपूजा मानणार्या समुदायांमध्ये विष पसरविण्याचे काम हे लोक करीत असतात. हिंदूंच्या भावनिक प्रश्नांची उत्तरं मिळत असताना हिंदूंचे रोजगार, अर्थकारण यांसारख्या प्रश्नांचीही उत्तरे आपल्याला शोधावी लागणार आहेत. २१वे शतक हे जसे तंत्रज्ञान विषयक स्फोटांचे असेल, तसेच तेच ते आर्थिक अस्थिरतांचे देखील असेल. हिंदूंनी हिंदू म्हणून एकत्र येण्याची प्रक्रिया जर अशी बहुआयामी ठरली, तर एक मोठी ताकद म्हणून आकाराला येण्यापासून हिंदू समाजाला कोणीही रोखू शकणार नाही!