तरुण भारत लाईव्ह। २१ फेब्रुवारी २०२३ : केशवस्मृती सेवासंस्था समूहव्दारे स्व. डॉ. अविनाश आचार्य यांच्या नावाने दिला जाणारा अविनाशी सेवा पुरस्कार, संस्था आणि व्यक्ती यांनी समाजाप्रती समर्पित भावनेने केलेल्या सेवेबद्दल दिला जातो. या वर्षांचा हा व्यक्तिगत पुरस्कार ठाणे येथील रवींद्र कर्वे तर संस्थास्तरावर संभाजीनगर येथील सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळास दिला जाणार असल्याची माहिती जळगाव जनता सहकारी बँकचे सीईओ पुंडलिक पाटील, केशव स्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की, पुरस्काराच्या माध्यमातून त्यांचे कार्य समाजासमोर आणून समाजातील प्रेरणा जागृतीचा प्रयत्न केला जातो. केशवस्मृती प्रतिष्ठान आणि जळगाव जनता सह. बँकेतर्फे देण्यात येणार्या या पुरस्काराचे स्वरूप संस्थेसाठी 1 लाख एक हजार रुपये सोबत मानपत्र, स्मृतीचिन्ह तर व्यक्तिगत 51 हजार रुपये सोबत मानपत्र, स्मृतीचिन्ह असे आहे. 26 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, महाबळ रोड, जळगाव येथे सायंकाळी 5 वाजता पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे. ज्येष्ठ अर्थतज्ञ, लेखक तथा श्रीगुरुजी रुग्णालय, नाशिकचे अध्यक्ष डॉ.विनायक गोविलकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
धुळे येथील विख्यात तत्वज्ञ व सनदी लेखापाल प्रकाश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या पुरस्कार समितीने वर्ष 2022-2023 साठी खालील पुरस्कारार्थींची निवड केली आहे. या समितीमध्ये माजी शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड, मु.जे.महाविद्यालयाच्या निवृत्त प्राध्यापिका पुनम मानुधने, अस्थि शल्य चिकित्सक डॉ.प्रताप जाधव सदस्य आहेत. जळगाव जनता सहकारी बँकेच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत माजी शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड व पूनम मानुधने यांनी वर्ष 2022-2023 पुरस्कारार्थी म्हणून नावांची घोषणा केली. पत्रकार परिषदेस जळगाव जनता सह. बँकेचे ज्येष्ठ संचालक सतीश मदाने, जळगाव जनता सहकारी बँकेचे सी.ई.ओ. पुंडलिक पाटील आणि केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचे आरोग्य संवर्धनात कार्य
सन 1989 पासून ‘स्वयंस्फूर्त परिवर्तन’ हे ब्रीद उराशी बाळगून सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ या संस्थेद्वारे विविध लक्षवेधी सामाजिक प्रकल्पांतर्गत शहरी उपेक्षित वस्त्या व दुर्गम ग्रामीण भागातील वंचितांसाठी विशेषतः महिला आणि युवा यांच्यासाठी सक्षमीकरणाच्या विविध संधी देणारा प्रकल्प म्हणून संस्थेची मराठवाड्यात ओळख आहे. आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, महिला सबलीकरण, शाश्वत विकास व नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात सेवा आणि प्रशिक्षण इत्यादी विषयांत संस्था कार्यरत आहे.
8 जिल्हे, 30 तालुके व 618 गावांमध्ये मंडळाचा कार्य विस्तार विविध 43 प्रकल्पांच्या माध्यमातून झाला आहे. शहरातील 67 वस्त्या 178 पूर्णवेळ कर्मचारी व 300 पेक्षा जास्त स्वयंसेवकांच्या माध्यमातून वर्षभरात 10 लाख लोकांपर्यंत संपर्क करत मंडळाची वर्धिष्णू वाटचाल थक्क करणारी आहे.
रवींद्र कर्वे यांचे सामाजिक कार्य
सन 1974 पासून मुंबई येथील विद्यार्थी परिषदेच्या कामात सक्रीय असलेल्या रवींद्र कर्वे ठाणे यांनी टी.जे.एस.बी. बँकेत 28 वर्ष मॅनेजर व 9 वर्ष मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सेवा दिली. दरम्यानच्या काळात बँकेच्या विस्ताराबरोबरच विद्यार्थी परिषद व संघ परिवाराच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी सहभाग नोंदविला. निवृत्तीनंतरचे आयुष्य अधिक समाजोपयोगी व्हावे या विचाराने आरोग्य व शिक्षण या क्षेत्रात काम करण्याचे ठरवून त्यांनी प्रारंभी नाना पालकर स्मृती समिती व नंतर विद्यार्थी विकास योजना अंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना मदत म्हणून काम सुरू केले. आतापर्यंत 32 जिल्ह्यांतील 1466 विद्यार्थी व 4 शाळा यांना 18.70 कोटी रुपयांची मदत केलेली आहे. प्रथम पुरुषी एकवचनी या संकल्पनेतून सुरू झालेल्या या कामाचे आता वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. 12 वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या दुर्बल, परंतू अत्यंत हुशार आणि प्रतिभावान विद्यार्थ्यांच्या शिक्षणासासाठी बळ पुरविणारी विद्यार्थी विकास योजना राबवित आहेत.