डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर!

तरुण भारत लाईव्ह । नवी दिल्ली : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र आता केंद्र सरकारने १४ एप्रिलला संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर रोजी राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली आहे. या संदर्भात, केंद्र सरकारने ११ एप्रिल रोजी राजपत्र जारी केले आहे. या अधिसूचनेनुसार भारत सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल रोजी संपूर्ण देशात सुट्टी जाहीर केली आहे.

दरम्यान, भारत सरकारची राजपत्र अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्देशही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या आदेशात सुप्रीम कोर्टात १४ एप्रिल रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या सूचनेनुसार ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासकीय सामान्य शाखेने ११ एप्रिल रोजी ही सूचना जारी केली होती.

 

दरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे हैदराबादमध्ये बाबासाहेबांच्या १२५ फूट उंच पुतळ्याचे त्यांच्या जंयतीच्या दिवशी उद्घाटन करणार आहेत. या संदर्भात ११ एप्रिल रोजी शासनाकडून अधिकृत निवेदनही जारी करण्यात आले. दरवर्षी आंबेडकर जयंतीनिमित्त केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र यावेळी केंद्र सरकारनेही बाबासाहेबांची जयंती राष्ट्रीय सुट्टी जाहीर करून त्यांना मोठी आदरांजली वाहण्याचे काम केले आहे.