नंदुरबार : जिल्ह्यातून वाहणाऱ्या तापी आणि नर्मदेचे वाहून जाणारे पाणी इथल्या शेतीसाठी उपयोगी यावे आणि येथील शेती सुजलाम सुफलाम व्हावी; हे माझ्या वडिलांनी पाहिलेले स्वप्न मी पूर्ण करणारच; असा ठाम विश्वास व्यक्त करतानाच खासदार डॉ. हिना गावित यांनी धडगाव लगतचा डोंगराळ भाग फोडून बोगद्याच्या माध्यमातून नर्मदेचे पाणी शहाद्यापर्यंत आणण्याच्या कामाला मोदी सरकार मुळे गती मिळाली असून सुमारे दहा हजार कोटी रुपयांचा निधी त्यासाठी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती दिली.
हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यावर जल नियोजना अभावी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आणि संपूर्ण शहादा तालुक्याला त्याचा लाभ होणार आहे. परंतु आमचे हे यश आमच्या राजकीय विरोधकांना खूपते आणि म्हणूनच धडगाव वाहून जाईल, अनेक गावं उठवले जातील, अशा अफवा पसरवत असतात. परंतु गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी तसली कोणतीही चिंता करायचे कारण नाही कारण त्या प्रकारचे काहीही घडणार नाही. केंद्र सरकारकडे मी सातत्याने पाठपुरावा चालू ठेवला आहे. ज्या दिवशी महाराष्ट्र सरकारकडून या प्रकल्पाची फाईल केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवली जाईल त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही ती मंजूर करून देऊ; असे भरीव आश्वासन आपल्याला मोदी सरकारकडून मिळालेले आहे; असेही खासदार डॉ. हिना गावित यांनी याप्रसंगी सांगितले.
शहादा तालुक्यातील परिवर्धन येथे अन्नदाता सेवा संघ आयोजित कृषी प्रदर्शन आणि शेतकरी मेळाव्यात प्रसंगी खासदार डॉक्टर हिना गावित बोलत होत्या. महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित अध्यक्षस्थानी होते तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. जिल्हा परिषदेच्या सभापती हेमलता शितोळे, शशिकांत शितोळे पाटील, ईश्वरभाई पाटील आणि अन्य पदाधिकारी तसेच शेती प्रकल्प प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनी आपल्या भाषणातून तंत्रज्ञानावर आधारित शेती करणे विषयी तसेच विविध निराळ्या पिकांची लागवड करीत प्रयोगशील शेती करण्याविषयी उपस्थित शेतकरी बांधवांना सुचित केले. तर आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून शेती उत्पन्नावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारणीला कशी गती दिली जात आहे तसेच महिला बचत गटांना प्रोत्साहन देऊन किती प्रकारचे अनुदान दिले जात आहे याची माहिती दिली.