नंदुरबार : लोकसभा मतदारसंघातील राजकीय, व्यावसायिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना खा.डॉ.हीना गावित व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित आज २९ रोजी राखी बांधणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम भव्य दिव्य होणार आहे.
नंदुरबार लोकसभा मतदार संघ व नंदुरबार जिल्हा परिषद, सर्व नगरपालिका, सर्व पंचायत समित्या तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेला प्रत्येक कार्यकर्ता मग ते कोणत्याही पक्षाचे असो माझे बंधूच आहेत,त्या प्रत्येकाशी आपले भावनिक ऋणानुबंध असल्याचे मी मानत आले आहे. भाऊ आणि बहीण हे फक्त रक्ताचेच नाते असते असे नाही. लोककल्याण या उदात्त हेतूशी नाळ जुळलेले सुद्धा एकमेकाचे खरे हितचिंतक आणि खरे बहिण-भाऊच असतात.
त्या प्रत्येक बहिणीचा त्या प्रत्येक भावावर भावनिक अधिकार असतो. बहिणीच्या आणि भावाच्या एकमेकांवरील त्या अधिकारांना लक्षात घेऊनच आज राजकारण आणि पक्ष बाजूला ठेवून मी आपणाला रक्षाबंधनाचा पवित्र धागा बांधण्यासाठी आपल्याला सादर निमंत्रित करीत आहे. बहिणीने दिलेल्या सादेला प्रतिसाद देऊन राखी बांधून घ्यायला उपस्थित रहाल, अशी अपेक्षा करते असे आवाहन खा.डॉ.हीना गावित व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांनी केले आहे.
सदर सामूहिक रक्षाबंधन सोहळ्याचा कार्यक्रम आज २९ दुपारी ३ वाजेपासुन ते ६ वाजेपर्यंत नंदूरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदीरात आयोजीत करण्यात आला आहे.यावेळी लोकसभा मतदार संघातील 8 तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम भव्य दिव्य होणार आहे.