Dr. Vijayakumar Gavit : आदिवासी भागातील शाळांचे डिजिटलायझेशन होणार, वाचा कधीपासून?

नंदुरबार : येत्या दोन वर्षात राज्यात आदिवासी भागातील सर्व शाळांचे डिजिटलायझेशन करण्यात येणार असून अभावाने ग्रासलेल्या दुर्गम भागात शिक्षणाचा प्रभाव निर्माण करून या भागातील माणूस उभा करण्याची क्षमता फक्त शिक्षकात आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित वर्ष २०२२-२३ च्या जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण संमारंभात ते बोलत होते. ते म्हणाले, ग्रामीण, आदिवासी भागातील शिक्षकांनी काळानुसार अपडेट राहणे गरजेचे असून त्यासाठी सध्याच्या शिक्षण प्रवाहातील नवतंत्रज्ञान त्यांनी आत्मसात करायला हवे. त्यासाठी लागणाऱ्या इंटरनेट, ब्रॉडबॅंड, संगणक, दूरचित्रवाणी संच यासारख्या सर्व माहिती-तंत्रज्ञानाच्या सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, असे मंत्री गावित यावेळी म्हणाले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, शिक्षण सभापती गणेश पराडके, महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित, समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, रूपसिंग तडवी, सुरेश नाईक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी (प्राथमिक), प्रवीण अहिरे (माध्यमिक) ‘डायट’ चे प्राचार्य डॉ. जयराम भटकर, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) वंदना वळवी, डॉ. युनुस पठाण (प्राथमिक), उपशिक्षणाधिकारी (योजना) भावेश सोनवणे व शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आदी उपस्थित होते.