---Advertisement---
पाचोरा, प्रतिनिधी : देशातील प्रमुख समस्यांपैकी बेरोजगारीचे प्रमाण ही समस्या कमी होण्यासाठी देशात स्टार्टअप कल्चर वाढण्याची आवश्यकता आहे. स्टार्टअप ही संकल्पना आता केवळ मोठ्या शहरांची मक्तेदारी राहील नसून छोट्या शहरांसह ग्रामीण भागातही पुढे येत आहे. देशात स्टार्टअपची संख्या वाढली तर बेरोजगारीचा दर निश्चितपणे कमी होईल, असा विश्वास स्टार्टअप मार्गदर्शक डॉ. युवराज परदेशी यांनी व्यक्त केला.
येथील श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघाच्या वतीने आयोजित युवकांसाठी स्टार्टअपच्या संधी या विषयावर डॉ. युवराज परदेशी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. डॉ.वासुदेव वले होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही.टी जोशी, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा.राजेंद्र चिंचोले , प्रा. सी एन चौधरी, शांताराम चौधरी, प्रमिला वाघ,अशोक शिंपी, सुधीर पाटील, विश्वास साळुंखे, ऍडव्होकेट महेश पवार ,उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील, प्रा.डॉ. जे डी गोपाळ आदी उपस्थित होते.
स्टार्टअप म्हणजे काय?, बिझनेस आणि स्टार्टअपमधील मूलभूत फरक, यशस्वी स्टार्टअप उभारण्यासाठी कोणते टप्पे महत्त्वाचे आहेत, याची सविस्तर माहिती मिळेल. मार्केट रिसर्चची गरज आणि प्रक्रिया, फंडिंग मिळवण्याचे मार्ग, योग्य को-फाऊंडर कसा शोधावा. यासह इन्क्यूबेटर्स, एंजल इन्व्हेस्टर, व्हेंचर कॅपॅटलिस्ट याबद्दल सखोल मार्गदर्शन डॉ.युवराज परदेशी यांनी केले. महाराष्ट्र शासनाने स्टार्टअप, उद्योजकता आणि नवोन्मेष धोरण २०२५ ला मान्यता दिली आहे , याद्वारे युवकांनी उद्योजकता वाढवावी अशा प्रकारचे मनोगत डॉ.युवराज परदेशी यांनी व्यक्त केले.
प्रा.राजेंद्र चिंचोले यांनी आपल्या मनोगतातून युवकांनी केवळ पदवीधर होऊन बेरोजगार न होता कौशल्याध्यिष्ठित ज्ञान आत्मसात करणे हे गरजेचे आहे. देशात स्टार्टअप ही संकल्पना मोठ्या प्रमाणात प्रचलित होणे गरजेचे आहे स्टार्ट अप संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहेत. स्टार्टअप म्हणजे उद्योजकतेतून सुरू केलेला एक नाविन्यपूर्ण व्यवसाय, जो भविष्यात मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता असते असे विचार मांडले.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. वासुदेव वले यांनी स्टार्टअप च्या माध्यमातून आपल्या देशाची ,राज्याची ,आपल्या परिवाराची प्रगती झाली पाहिजे यासाठीचे प्रयत्न केले पाहिजे असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमात इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर पदी निवड झालेले सिद्धार्थ चौधरी, कोरिया येथे संशोधन कार्यासाठी गेलेले महाविद्यालयाचे प्रा. डॉ. शरद पाटील , महाराष्ट्र विज वितरण कंपनीत निवड झालेले महाविद्यालयाचे सुरक्षारक्षक प्रवीण खेडकर यांचा सत्कार संस्थेचे व्हॉइस चेअरमन व्ही. टी. जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. सिद्धार्थ चौधरी यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी केली यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन शांताराम चौधरी यांनी केले. तर आभार प्रा. डॉ. स्वप्नील भोसले यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.