Drama Competition : कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत जळगावचे हम दो नो प्रथम

Drama Competition : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नाशिक विभागातर्फे नाशिक विभागस्तरावर घेण्यात आलेल्या ६९ व्या नाट्य महोत्सवाच्या नाशिक येथे झालेल्या प्राथमिक फेरीत जळगावच्या ललित कला भवन कामगार वसाहततर्फे सादर करण्यात आलेल्या डॉ.हेमंत कुलकर्णी लिखीत व अपूर्वा कुलकर्णी दिग्दर्शित ‘हम दो नो’ या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळून, त्याची अंतिम फेरीत निवड झाली आहे.

जळगाव विभागात इतर मिळालेली वैयक्तिक पारितोषिकांमध्ये दिग्दर्शन प्रथम – अपूर्वा कुलकर्णी (हम दो नो), अभिनय प्रथम पुरुष – अम्मार मोकाशी (हम दो नो), अभिनय प्रथम स्त्री – नेहा पवार (हम दो नो) यांच्यासह अभिनय प्रमाणपत्र – भूषण खैरनार (विठ्ठला- कामगार कल्याण केंद्र जळगाव), सुमीत राठोड (पेढे वाटा पेढे – का.क.केंद्र दीपनगर, भुसावळ), विशाखा सपकाळे (ती – ललित कला भवन, जळगाव), शुभांगी वाडिले (म्याडम – का.क.केंद्र पिंप्राळा), मृदुला बारी (ती – ललित कला भवन, जळगाव), तर तांत्रिक बाजूंमध्ये का.क.केंद्र जोशीकॉलनी, जळगावच्या विठ्ठला या नाटकासाठी उत्कृष्ट पार्श्वसंगीताचे तिसरे पारितोषिक महेंद्र खेडकर यांना तर का.क.केंद्र पिंप्राळाच्या म्याडम या नाटकासाठी उत्कृष्ट प्रकाशयोजनेचे तिसरे पारितोषिक विशाल जाधव यांना मिळाले आहे.

नाशिक येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात झालेल्या या प्राथमिक फेरीत जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक येथील नाटकांचा समावेश होता. या प्राथमिक फेरीसाठी सुनिल सुळेकर, हेमंत गव्हाणे, सौ.पल्लवी कदम यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे कामगार आयुक्त रविराज इळवे, सहाय्यक कल्याण आयुक्त सयाजी पाटील, कामगार कल्याण अधिकारी सत्यजित चौधरी, कामगार कल्याण निरीक्षक भानुदास जोशी यांनी अभिनंदन केले आहे.