नंदुरबार : मंदिराचे पावित्र्य टिकून राहावे, मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे व्हावीत, मंदिरातून अहिंदूंना व्यापारासाठी प्रवेशबंदी करावी, मंदिरे सरकारने नव्हे; तर भक्तांनी चालवावीत, मंदिरांचे संघटन व्हावे, अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद घेण्यात आली. परिषदेत सहभागी मंदिरांनी एकमताने मंदिरात वस्त्रसंहिता अर्थात ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच त्याला आरंभ करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदु जनजागृती समिती आणि श्री दंडपाणेश्वर संस्थान यांच्यातर्फे येथील श्री दंडपाणेश्वर मंदिरात महाराष्ट्र न्यास परिषद घेण्यात आली. परिषदेत जिल्ह्यातील सर्वच ६ तालुक्यांतून तसेच जवळच्या धुळे जिल्ह्यातील साक्री आणि शिंदखेडा (दोंडाईचा) येथूनही ९० हून अधिक मंदिरांचे १५० हून अधिक विश्वस्त, अर्चक पुरोहित, सेवेकरी उपस्थित होते.
हरिभक्त परायण खगेंद्र बुवा महाराज, जळगाव येथील पुरातन सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी संस्थानचे सचिव नीलकंठ चौधरी, श्री दंडपाणेश्वर देवस्थानचे अध्यक्ष किशोर वाणी तसेच हिंदू जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र सेवक प्रशांत जुवेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून परिषद सुरू झाली. किशोर वाणी यांनी प्रास्ताविक केले.
परिषदेत मंदिर संस्कृती जतन आणि संवर्धनाची आवश्यकता या महत्त्वपूर्ण विषयावर हरिभक्त परायण खगेंद्र बुवा महाराज यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या कार्याची भूमिका मंदिर महासंघाचे जळगाव जिल्हा समन्वयक नीलकंठ चौधरी यांनी मांडली. मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्र झाली पाहिजेत या विषयावर सनातन संस्थेचे उदय बडगुजर यांनी मार्गदर्शन केले.
कुकरमुंडा येथील गादीपती हरिभक्त परायण उद्धव महाराज यांनी आशीर्वचनपर मार्गदर्शन केले, तसेच हिंदूंच्या यात्रा, मंदिरे येथे अहिंदूंना व्यवसाय करण्यास बंदी का आवश्यक आहे या विषयावर प्रशांत जुवेकर यांनी विवेचन केले. मंदिरात वस्त्रसंहिता आवश्यक आहे का? या महत्त्वपूर्ण विषयावर परिसंवाद घेण्यात आला, ज्यात शहादा येथील श्री म्हाळसादेवी मंदिराचे विश्वस्त प्रा. गणेश सोनवणे, अधिवक्ता अनिल लोढा आणि प्रा. डॉ. सतीश बागूल यांनी मते मांडली. हिंदू जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या सायली पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
आरंभी शंखनाद श्री डुबकेश्वर महादेव मंदिराचे विश्वस्त आणि गोसेवक आनंद मराठे यांनी केला. वेदमंत्र पठण केले. मंदिर संस्कृती संवर्धनाच्या दृष्टीने काही ठराव संमत करून घेण्यात आले, ठरावाचे वाचन हिंदू जनजागृती समितीचे जितेंद्र मराठे यांनी केले. समितीचे प्रा. डॉ. सतीश बागूल यांनी आभार मानले. परिषदेचा समारोप छाया संगीत साधना संगीत विद्यालयाच्या संस्थापक सुनीता चव्हाण यांनी म्हटलेल्या पसायदानाने झाला.
यापुढे तालुकास्तरावर होणार बैठका
परिषदेमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील सहाही तालुक्यांसह धुळे जिल्ह्यातील साक्री आणि दोंडाईचा परिसरातील मंदिरांचे पुजारी, विश्वस्त, अर्चक उपस्थित होते. यासाठी आता तालुका स्तरावर बैठका घेण्यात येणार असून, भविष्यात धुळे जिल्ह्यात असेच स्वतंत्र मंदिर परिषद घेण्याबाबतही निर्णायक चर्चा झाली.