कधी कोणत्या गोष्टींची चोरी होईल हे काही सांगू शकत नाही. अंधेरीच्या मरोळ मच्छी मार्केटमधून चक्क सुक्या बोंबीलची (Bombil Stolen )चोरी झाली आहे. या प्रकारामुळं एकच खळबळ माजली आहे. अंधेरीच्या मरोळ मच्छी मार्केटमध्ये ही चोरी झाली असून हे सुक्या बोंबीलची किंमत चक्क दीड लाखांच्या घरात होती. या प्रकरणी व्यवसायिक आरती बारिया यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे.
आरती बारिया (33) या मच्छी व्यावसायिक आहेत. त्या गुजरातवरुन मासे मागवून मरोळ मच्छी मार्केटमध्ये विक्री करतात. त्यांनी नोव्हेंबर महिन्यात जवळपास 696 किलोंच्या सुक्या बोंबलाची ऑर्डर दिली होती. त्यानुसार 16 नोव्हेंबर रोजी रुपाली बावस्कर यांच्या गाड्यांमध्ये हे सुके बोंबील ठेवण्यात आले होते. त्यासाठी त्यांनी आधीच भाडे देखील भरले होते. मात्र, 18 डिसेंबरला बावस्कर यांनी बारिया यांना मच्छी मार्केटला बोलवून घेतले. बरिया यांनी ठेवलेल्या 15 गोणी त्या ठिकाणाहून गायब होत्या.
बारिया यांनी गाडीत ठेवलेले बोंबील गायब झाल्याने त्यांना धक्काच बसला. या बोंबलांची किंमत जवळपास 1.50 लाख इतकी होती. त्यांनी मार्केटमधील व्यापारी आणि मजूर यांच्याकडेही चौकशी केली. सुरुवातीला गोणी हरवल्या असतील असा अंदाज त्यांनी लावला मात्र, शोध घेऊनही गोण्या न मिळाल्या नाहीत. दुसऱ्या कोणत्या ग्राहकाकडे या गोण्या दिल्यात का? याची चौकशीदेखील त्यांनी केली. मात्र, काहीच उपयोग झाला नाही.
अनेक ठिकाणी चौकशी केल्यानंतरही त्यांना बोंबील न मिळाल्याने अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीनुसार 25 डिसेंबर रोजी अंधेरी पोलिस स्थानकात गुन्हा नोंद केला. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. सीसीटीव्हीच्या आधारे अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.
दरम्यान, आरोपीने सुक्या बोंबीलच्या 15 गोण्या लंपास केल्या आहेत. सुक्या बोंबीलचा वास उग्र असतो. अशावेळी चोर इतका मोठा साठा दुर्गंधी न येता कसा लपवून ठेवणार, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तसंच, सुक्या मासळीची चोरी होण्याचा हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. असा प्रकार पहिल्यांदा घडल्याने पोलिसांसमोरही चोराला पकडण्याचे आव्हान ठाकले आहे.