Jjalgaon : बाजारपेठेत लसणाची आवक कमी झाली आहे. तसेच मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लसणाचे भाव वाढले असून, गृहिणींना आता लसणाविना भाजीला फोडणी द्यावी लागणार आहे. दरम्यान, सोमवारी चंपाषष्ठी असल्याने साठ रुपये किलो दराने विकले जाणारे भरिताचे वांगे रविवारपर्यंत शंभरी गाठण्याची शक्यता भाजीपाला विक्रेत्यांनी व्यक्त केली.
मागील आठवड्यात अवकाळी पावसामुळे लसणाच्या आवकेवर परिणाम झाला. बाहेरगाहून येणारा लसणाची पारोळा बाजारपेठेत आवक कमी झाल्यामुळे १०० रुपये किलो दराने मिळणारा लसूण आता २४० रुपये किलो दराने विकला जात आहे.
रोजच्या जेवणात प्रत्येक भाजीत लसूण असल्याशिवाय चव येत नाही. मात्र लसूण महागल्याने गृहिणींचा हिरमोड झाला असून, भाजीत लसूण हा कमी प्रमाणात अथवा नसून विना भाजीला फोडणी दिली जात असल्याचे महिला वर्गांनी बोलून दाखविले. सध्या स्थितीत भाजीपाल्याचे दर समाधानकारक मानले जाते. सकाळी धुरडीचे प्रमाण वाढल्यामुळे भाजीपाला विक्री तेजीत दिसून येते.
आजचे भाजीपाल्याचे दर असे :
लसूण- २४० रुपये किलो, भरीत वांगे ६० रुपये, कांद्याची पात ६० रुपये, वाटाणा ४० रुपये, फुलकोबी ६० रुपये, पत्ता कोबी ३० रुपये, टमाटे २० रुपये, शेवगा १०० रुपये या प्रमाणे विकला जात आहे. दरम्यान, लसणाची आवक वाढून त्याचे दर कमी व्हावे, अशी अपेक्षा महिलावर्ग यांनी व्यक्त केली आहे.
कोथिंबीर व मेथी भाजी वाट्यावर
हिवाळ्यात मेथीच्या भाजीची आवक मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे भावही स्थिर असतात. चाळीस रुपये किलो दराने विकली जाणारी मेथी आज दहा रुपये वाट्यावर तर मागील दोन महिन्यात दीडशे रुपये पार करणारी कोथिंबीर दहा रुपये जुडीने बाजारात विकली जात आहे.
चंपाषष्ठी वांगी महागणार
खानदेशात कुलदैवत खंडेराव महाराजांची तळी भरण्याचा व भंडारा उधळण्याचा कार्यक्रम दरवर्षी चंपाषष्ठीला केला जातो. या वेळी सामूहिकपणे खंडेरावाचा उदो उदो करत भरीत व भाकरीचा नैवेद्य प्रसाद म्हणून खाऊन खंडेराव चरणी नतमस्तक होत सर्वांना आयुष्य चांगले जगू दे अशी प्रार्थना केली जाते.