भुसावळ : खासदार रक्षा खडसे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे नांदेड ते हजरत निझामुद्दीन दिल्ली संपर्क क्रांती एक्स्प्रेसला भुसावळ रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. यामुळे भुसावळ स्थानकावरून दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नांदेड ते निजामुद्दीन (गाडी क्र.१२७५३) व निजामुद्दीन ते नांदेड (गाडी क्र.१२७५४) संपर्क क्रांती एक्सप्रेस ही गाडी ४ एप्रिल २०२३ पासून भुसावळला थांबणार आहेत. ही गाडी आता दिल्लीला जातांना तसंच येतांना भुसावळ स्थानकावर पाच मिनिटं थांबणार आहे.
संपर्क क्रांती एक्सप्रेसला आजवर जळगाव रेल्वे स्थानकाला थांबा होता. ही रेल्वे गाडी भुसावळला थांबत नव्हती. आता मात्र खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांनी दोन्ही बाजूने धावणार्या या सुपरफास्ट एक्सप्रेसला भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबा मिळणार असल्याने भुसावळसह परिसरातील प्रवाशांना सुविधा मिळणार आहे.
रावेर लोकसभा क्षेत्रातील नांदुरा, मलकापूर, रावेर, सावदा, भुसावळ ई. स्टेशन व विविध रेल्वे गाड्यांना स्थांबा मिळणे बाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी रेल्वे मंत्री श्री.आश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केले असता, आज सदर संपर्क क्रांती एक्सप्रेस गाडीस भुसावळ स्टेशन येथे थांबा देण्यात आला असून, इतर स्टेशन येथे काही महत्वाच्या गाड्यांना थांबा मिळण्याबाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे पाठपुरावा सुरूच ठेवणार आहे अशी माहिती यावेळी खासदार कार्यालय यांच्या मार्फत देण्यात आली आहे.