चोपडा : विरवाडेमधून एक धक्कादायक घटना उघडीस आली आहे. किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरुन तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री ९ वाजेदरम्यान घडली. या प्रकरणी पोलीसांत गुन्हा दाखल असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. भोजु कोळी असे मयत तरुणाचे नाव आहे तर दिपक सुभाष कोळी, कैलास गुलाब कोळी, मनोहर संतोष कोळी असे आरोपींचे नाव आहे.
तालुक्यातील विरवाडे येथील सबस्टेशनजवळ २ मार्च रोजी रात्री नऊ वाजेदरम्यान ही घटना घडली. पोलिसांत दिलेल्या माहीतीनुसार, फिर्यादीचे घरासमोरील अंगणात आरोपी दिपक कोळी व फिर्यादीचा मुलगा भोजु कोळी यांचा एकमेकांना धक्का लागला. या कारणावरुन आरोपीने फिर्यादीचा मुलगा भोजु कोळी व राजेंद्र कोळी यांना शिवीगाळ दमदाटी तसेच धक्काबुक्की केली.
आरोपी इथेच थांबला नाही तर राजेंद्र कोळी याचे कपाळावर दगड मारुन डोके फोडुन दुखापत केली. त्यानंतर सदर भांडणाचा राग मनात ठेवुन आरोपी सागर देविदास कोळी व शोभाबाई देविदास कोळी हे फिर्यादीचे घरासमोर अंगणात येवुन फिर्यादी तसेच फिर्यादीचा मुलगा भोजु कोळी यास शिवीगाळ दमदाटी तसेच चापटा बुक्यांनी मारहाण केली. त्याचवेळी आरोपी सागर देविदास कोळी याने त्याच्याजवळील धारधार शस्त्राने फिर्यादीचा मुलगा भोजु कोळी याच्या खून केला. याप्रकरणी चोपडा पोलिसांत विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दिपक सुभाष कोळी, कैलास गुलाब कोळी, मनोहर संतोष कोळी यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले हे करीत आहेत.