स्फोटाच्या दणक्याने शटर झाले बंद अन् महिला अडकल्या आत, घडला अनर्थ

पिंपरी : पिंपरी चिंचवड परिसरात असणाऱ्या तळवडे येथे ज्योतिबा मंदिराच्या मागे असलेल्या एका फटाक्याच्या कंपनीमध्ये स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यात सहा महिलांचे मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहेत. अजूनही काही मृतदेह आत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुपारी साधारण अडीच ते पावणे तीनच्या सुमारास ही घटना घडली. वाढदिवसाला केकवर लावण्यात येणाऱ्या मेणबत्ती आणि फटाक्यांची ही कंपनी असल्याची माहिती समोर आली आहे

या कंपनीत काम करणाऱ्या सर्व महिला कामगार असून तापमान वाढल्याने हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अचानक स्फोट झाल्याने आणि आता आणि बाहेर ये-जा करण्यासाठी एकच शटर असल्याने या महिला आत अडकल्या गेल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. स्फोटची तीव्रता एवढी होती की, आवाजाने शटर बंद झाले होते. त्यामुळे महिलांना बाहेर पडणे अवघड झाले. त्यात त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय अजून काही महिला जखमी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

घटना घडल्यानंतर जवळ असलेल्या नागरिकांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवले होते. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे आदी घटनास्थळी दाखल झाले असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात आठ जण जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत

दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल- अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तळवडे येथे फायर कॅरॅकेर कारखान्यामधील दगावलेल्या कुटुंबाबद्दल दुःख व्यक्त केले. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करून दिली.

पिंपरी-चिंचवडमधील तळवडे येथे केकवरील फायर कँडल बनवण्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे. मी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतो. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. जखमींवर उपचार सुरु असून त्यांना लवकरात लवकर बरे वाटेल, अशी प्रार्थना करतो, असे आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी पूर्ण उपाययोजना केल्या जातील.