तिरुवनंतपूरम | कोरोनाच्या संकटातून संपूर्ण जग बाहेर पडलं आहे. या संकटातून अनेकांचे जीव वाचले आहेत. मात्र आता आणखी एका नव्या संकटाला लोकांना सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे. एका नव्या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. केरळमध्ये निपाह व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वी केरळच्या कोझिकोट येथील एका खासगी रुग्णालयात निपाह व्हायरसने दोन लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या व्हायरसचा प्रकोप वाढतच जात आहे.
निपाह व्हायरसचा प्रकोप वाढल्याने राज्य सरकारने अलर्ट जारी केला आहे. केरळ सरकारने केरळातील सात गावातील शाळा आणि बँका बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. केरळातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्यात एकूण 700 संशयित रुग्ण असून त्यांच्यामुळे राज्याचं टेन्शन वाढलं आहे. दोन्ही मृत व्यक्तींचे सँपल पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीमध्ये पाठवले आहेत.
दोन लोकांचा मृत्यू झाल्यानंतर कन्नूर, वायनाड आणि मलप्पुरम या तीन जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सात ग्रामपंचायतीत कंटेन्मेंट झोन बनवण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन निर्माण करण्यात आले आहे, तिथे मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तसेच कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातही निपाहमुळे अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोझिकोडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मीडियाशी संवाद साधला. सात पंचायत समित्यातील सर्व शाळा, शैक्षणिक संस्था, आंगणवाडी केंद्र, बँका आणि सरकारी संस्था बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फक्त औषधांची आणि अति महत्त्वाच्या वस्तुंची दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.