दुर्देवी! स्विमिंग पुलमध्ये पडून अवघ्या चार वर्षीय अविष्कारचा करुण अंत

तरुण भारत लाईव्ह । १९ मे २०२३। मे महिन्यात शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे कोकण मध्ये  पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. अनेक रिसॉर्ट-समुद्रकिनारे शाळांना पडलेल्या सुट्ट्यांमुळे पालक आपल्या कुटुंबासमवेत समुद्रकिनाऱ्यांवर सफर करण्यासाठी कोकणात दाखल झाले आहेत. मात्र अशातच, दिवेआगर परिसरात एका छोटया मुलाचा रिसॉर्टच्या स्विमिंग पुलमध्ये पडून दुर्दैवीरीत्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अविष्कार येळवंडे असे या चिमुकल्याचे नाव आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पुण्यातील खेड-सावरदारी येथील अविनाश येळवंडे यांचे कुटुंब कोकणात दिवेआगरच्या इलाईट रिसॉर्टमध्ये आले होते. आल्या दिवशीच हे कुटुंब दिवेआगर समुद्रावरही फिरून आले होते. त्यामुळे सकाळी वडील आपली गाडी धुण्यासाठी खोलीतून खाली आले होते, यावेळी गाडी धुताना त्यांच्यासोबत खाली आलेला त्यांचा छोटा मुलगा अविष्कार त्यांच्यापासून नजर चुकवून दूर जाऊन रिसॉर्टच्या स्विमिंग पूल परिसरात एकटाच फिरत होता.

मुलगा दिसेनासा झाला हे लक्षात येताच त्याची शोधाशोध सुरू झाली आणि शोधाशोध सुरु झाल्याच्या थोड्याच वेळात त्याच्या वडिलांना स्विमिंग पूलमध्ये तरंगत असलेले धक्कादायक दृश्य दिसले. त्याच बरोबर मुलाला तात्काळ जवळच्या बोर्ली पंचतन येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. आई-वडिलांची नजर चुकवून तो स्विमिंग पूलमध्ये गेला, पूलमध्ये पाय टाकून बसला. त्यातच पाण्यात उतरण्याचा मोह त्याला झाला असावा. स्विमिंग पूल त्याच्या उंचीपेक्षा खूपच जास्त खोल होते, त्यामुळे काही वेळातच तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला.

अविष्कार स्विमिंग पूलकडे कसा गेला? कधी पडला? हे अविनाश यांच्याही लक्षात आलं नाही, या सगळ्या घटनेची नोंद दिघी सागरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

पर्यटकांनी आपल्यासोबत असलेल्या लहान-मोठ्या मुलांची काळजी जबाबदारीपूर्वक घेणे आवश्यक आहे, अन्यथा अशा दुर्दैवी घटना घडू शकतात. त्यामुळे पर्यटकांनी काळजी घ्यावी, असं स्पष्ट मत पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलं आहे. या दुर्देवी घटनेने येळवंडे कुटुंब तसेच परिसरावर शोककळा पसरली आहे.