तरुण भारत लाईव्ह । २८ ऑगस्ट २०२३। औरंगाबादच्या गंगापूर शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका खासगी बँकेत कर्ज वसुलीचे काम करणाऱ्या एकाने अवैधरित्या गावठी कट्टा विकत घेतला पण तोच गावठी कट्टा चालवायचा कसा हेच माहित नसल्याने अचानक गोळी सुटली आणि त्याच्याच अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलाच्या डोक्यात गोळी शिरली त्यामुळे मुलगा गंभीर जखमी झाला. मुलाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अखेर त्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला. आर्यन राहुल राठोड वय 2 वर्षे असे मृत चिमुकल्याचे नाव असून, राहुल कल्याण राठोड वय 29 वर्ष असे त्याच्या वडिलांचे नाव आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या गंगापूर शहरात अहिल्यादेवीनगर येथे राहुल कल्याण राठोड आपली पत्नी संगीता आणि अडीच वर्षांच्या मुलासह वास्तव्यास आहे. राहुल हा कर्ज वितरण करणाऱ्या एका बँकेत वसुलीचे काम करतो. आपल्या कामात वसुली करावी लागत असल्याने त्याने एक गावठी कट्टा विकत घेतला. पण हा गावठी कट्टा नेमका चालवला कसा? हे राहुलला माहित नव्हते.
यादरम्यान घरी आल्यावर राहुलने आपल्या पत्नीला गावठी कट्टा दाखवत असताना अचानक कट्ट्यातून गोळी सुटली आणि त्याच्याच अडीच वर्षाच्या मुलाच्या डोक्यात शिरली यामध्ये आर्यन हा गंभीर जखमी झाला त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते. शुक्रवार रात्री त्याची शस्त्रक्रिया केली होती. तेव्हापासून तो घाटीतील अतिदक्षता विभागात होता. त्याची मृत्यूशी झुंज सुरुच होती. दरम्यान, ४८ तासांनंतर मृत्यूशी झुंज अखेर संपली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. तसेच राहुलला ताब्यात घेऊन अटक केली होती. मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच परिसर हळहळून गेला होता.