तरुण भारत लाईव्ह । १२ मे २०२३। परभणीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सेप्टिक टॅंकची साफसफाई करत असताना गुदमरून पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा परिसरामध्ये एका शेतामध्ये गुरुवार ११ मे रोजी मध्यरात्री घडली आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, शेख सादेक, शेख जुनेद, शेख शारोक, शेख नवीद, शेख फेरोज, जमीर शेख शौचालयाच्या सेप्टिक टॅंकची साफसफाई करण्यासाठी गेले होते. ते दुपारचे तीन वाजल्यापासून त्यांची साफसफाई करत असताना मध्य रात्री उशिरा अचानक त्यांना गुदमरल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. हा प्रकार त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर याबाबतची माहिती प्रशासनाला देण्यात आली.
यावेळी शेख सादेक, शेख जुनेद, शेख शारोक, शेख नवीद या पाच जणांना तातडीने परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रात्री त्यांना उशिरा तपासून मृत घोषित केले. तर, जमीर शेख यांना उपचारासाठी परळी येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर परळी येथे उपचार करण्यात येत आहेत.