आधी देशसेवा आता करतोय गावसेवा; एकदा वाचाच कोळंबा ग्रा.प.च्या रिटायर्ड फौजी उपसरपंचाची कहाणी

डी . बी . पाटील 
चोपडा :  तालुक्यातील गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांचा रिटायर्ड फौजी पुतण्या भाऊसाहेब दुर्योधन बाविस्कर हे देशसेवेतून निवृत्त होऊन नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कोळंबा – वडगावसिम ग्रुप ग्रा‌.पं.च्या उपसरपंच पदावर बिनविरोध निवडून आले आहेत.
शेतकरी कुटूंबात जन्मलेले भाऊसाहेब बाविस्कर यांनी कठोर परिश्रम करून सन २००३ मध्ये नाशिक सेंट्रल येथे ट्रेनिंग करून ऑल्टलरी विभागात हवालदार पदावर नोकरी मिळवली होती. तेथुन त्यांनी पंजाब मधील फिरोजपुर, पठाणकोट, अमृतसर, आगरतला तसेच अरूणाचल मधील ठेंगा, जम्मू आणी काश्मीर मधील कारगील, बंगाल मधील एनजीपी याठिकाणी कर्तव्यदक्ष सेवा बजावली आहे.
सन २०१९ मध्ये १७ वर्षांची सेवा समाप्त करून भाऊसाहेब घरी येऊन उत्तम शेती करू लागले. आज ते पंचक्रोशीत  प्रगत शेतकरी म्हणून ओळखले जातात. अशातच कोळंबा- वडगावसिम ग्रुप ग्रामपंचायतीची निवडणूक लागली. त्यात ग्रामस्थांनी त्यांना निवडणुकीत उमेदवारी करायला सांगितले. परंतु वादविरोध नको म्हणुन निवडणूक बिनविरोध व्हावी अशी त्यांची इच्छा होती. काही कारणास्तव त्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले. त्यात ग्रामस्थांनी त्यांना बहुमताने निवडून दिले.
 ग्रा.पं.कमेटीने ठरल्याप्रमाणे त्यांची उपसरपंच पदावर बिनविरोध निवडही केली. देशसेवेनंतर ग्रामसेवा करावी हा संकल्प करून रिटायर्ड फौजी भाऊसाहेब बाविस्कर आता उपसरपंच पदावर आरूढ होऊन सर्वांना समान न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
पारिवारिक शुभेच्छा व आशीर्वाद देतांना गोरगावलेचे माजी सरपंच श्री व सौ.आशाबाई जगन्नाथ बाविस्कर  यांनी भाऊसाहेब यांना “सामान्य जनतेचा स्वाभिमान कायम राखून नि:स्वार्थ मानवसेवा व ग्रामविकास करावा,” असाही कानमंत्र दिला आहे.