छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील तीन तालुक्यांमध्ये आज सकाळी भुकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची नोंदी ४.५ असल्याचे सांगण्यात आले. या भूकंपामुळे काही घरांना तडे गेल्याचे वृत्त असून दोन घरे पडल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे कळते. मात्र भुकंपाच्या धक्क्यांनी संपूर्ण परिसरात घबराहट पसरली आहे.
मराठवाड्यातील हिंगोली, परभणी व नांदेड भागात आज सकाळी ६.०८ मिनिटांनी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. हिंगोली जिल्हयातील सर्वच जवळ ७१० गावांमध्ये गुरुवारी (ता. २१) पहाटे ६ वाजून ८ मिनिटांनी भूकंपचा धक्का बसला आहे. ४.५ रिश्टर स्केलची नोंद झाली तर त्यानंतर काही वेळातच झालेल्या दुसऱ्या धक्क्याची ३.६ एवढी नोंद झाली असल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सुत्रांनी सांगितले. या भूकंपामुळे नुकसान झाल्यास त्याची माहिती तातडीने प्रशासनाला देण्याच्या सुचनाही गावपातळीवरील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
२१ मार्च रोजी सकाळी ६ वाजून ८ मिनिटांनी ४.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रणेवर दिसून आली. हिंगोली वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात भूकंपाचे केंद्र असल्याचे दिसून आले. याची खोली १० किलोमीटर होती.
लगेचच दुसरा हलका धक्का अकरा मिनिटांनी म्हणजे सकाळी ६ वाजून १९ मिनिटांनी 3.6 रिश्टर स्केल चा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रणेवर दिसून आली. मात्र या भूकंपाचे केंद्र तीन किलोमीटर दक्षिणेला असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या रामेश्वर तांड्याच्या दक्षिण भागात असल्याचे दिसून आले.
दरम्यान, आज पहाटे सहा वाजून आठ मिनीटांनी जमीन चांगलीच हादरली. भूकंपाचा मोठा आवाजही झाला. विशेष म्हणजे आजचा भूकंप जिल्हयातील सर्वच ७१० गावांमध्ये जाणवल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये औंढा नागनाथ, वसमत, कळमनुरी तालुक्यात त्याची तिव्रता अधिक होती तर हिंगोली व सेनगाव तालुक्यातील काही गावांत कमी अधिक तिव्रता जाणवली आहे. या घटनेमुळे गावकरी चांगलेच हादरून गेले आहेत. दांडेगाव येथे काही घरांची पडझड झाली आहे.