तरुण भारत लाईव्ह ।१५ मार्च २०२३। रोज नवीन काहीतरी खाण्याची इच्छा होते. पण रोज रोज नवीन काय बनवावे हा प्रश्न पडतो. सुरळीच्या वड्या तुम्ही घरी ट्राय करू शकता. सुरळीच्या वड्या घरी कशा बनवल्या जातात हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
बेसन पीठ, आंबट ताक, किसलेले ओले खोबरे, बारीक चिरलेली कोथिंबीर, मोहरी, आवश्यकतेनुसार तेल, चवीनुसार मीठ, लाल तिखट
कृती
सर्वप्रथम एक पातेल्यात ताक घेऊन त्यात लाल तिखट व चवीनुसार मीठ घालावे. त्यातच बेसन पीठ घालून ते चांगले फेटून घ्यावे, एवढं झाल्यावर गॅसवर नॉनस्टिक पॅनमध्ये दोन ते तीन छोटे चमचे तेल टाकून ते कडकडीत गरम करा. मग त्यात बेसन आणि ताकाचे केलेले मिश्रण टाका व सतत ढवळत राहा. जोपर्यंत पीठ चमच्याला धरून घट्ट धार लागत नाही, तो पर्यंत ढवळत राहायचे. असे घट्ट धारेचे मिश्रण तयार झाले की गॅस बंद करा.
मग एका मोठ्या पसरट ताटाला तेलाचा मुलामा देऊन हे पिठाचं मिश्रण हलकेच कागदाच्या पापुद्र्या इतके पसरट पसरवून घ्यावे. अशी दोन तीन ताटं तयार करावीत. पंधरा मिनिटांनी हे थंड झाले की त्याच ताटावर त्या पसरवलेल्या पिठावर सरळ रेषेत सुरीने काप द्यावेत आणि त्याच्या सुरळ्या बनवाव्यात. ह्या सर्व सुरळीच्या वड्या एका चांगल्या ताटात ठेवून त्यावर ओले खोबरे व कोथींबीर छान पेरावी. मग दोन चमचे तेलात एक चमचा मोहरीची खमंग फोडणी तयार करावी. ही खमंग फोडणी सुरळीच्या वड्यांवर छान पसरावी, म्हणजे आपल्या छान सुरळीच्या नाजुक वड्या खायला तयार!