नवी दिल्ली : केंद्रीय तपास संस्थांच्या कथित गैरवापराबाबत विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ १४ विरोधी पक्षांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे.
सीबीआय आणि ईडीच्या कारवाईमुळे अनेक विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर तपास संस्थांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस, आप, आरजेडीसह अनेक पक्षांचे म्हणणे आहे की केंद्र सरकार विरोधी पक्षांवर बदला घेण्यासाठी या संस्थांचा वापर करत आहे. या याचिकेवर सरन्यायाधी न्या. चंद्रचूड, न्या. पी. एस. नरसिंह आणि न्या. जे. बी. पारडिवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
विरोधी पक्षांच्या वतीने वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी हे युक्तीवाद करणार आहेत. याचिकेत म्हटले आहे की, २०१४ मध्ये एनडीए सरकार सत्तेत आल्यानंतर सीबीआय आणि ईडीने दाखल केलेल्या खटल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, दोषसिद्ध होण्याचे प्रमाण केवळ चार ते पाच टक्के आहे. याचिकेमध्ये अटकपूर्व जामीन आणि अटकेनंतरचे दिशानिर्देश देण्याची विनंती करण्यात आली आहे.