नवी दिल्ली : बेहिशोबी मालमत्तांवर धाडी टाकणाऱ्या ईडीची सध्या महाराष्ट्रासह देशभरात मोठी चर्चा आहे. अनेक राजकारण्यांसह व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी ईडीची धास्ती घेतली आहे. मात्र ईडीचेच अधिकारी बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याच्या प्रकरणात सीबीआयच्या जाळ्यात अडकले आहेत. ईडीमध्ये सहाय्यक संचालक पदावर असलेल्या पवन खत्री या अधिकाऱ्याला ५ कोटी रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी सीबीआयने अटक केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दिल्लीतील दारु घोटाळ्याप्रकरणी पवन खत्री या अधिकाऱ्याने आरोपी अमनदीप सिंह ढल्ल याच्याकडून ५ कोटींची लाच घेतली होती. त्यानंतर ईडीच्याच विनंतीवरून सीबीआयने दोन आरोपी अधिकारी, सहायक संचालक पवन खत्री आणि अतिरिक्त विभागीय लिपिक नितेश कोहर यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला होता. या प्रकरणात अन्य आरोपींमध्ये एअर इंडियाचे कर्मचारी दीपक सांगवान, व्यापारी ढल्ल, बिरेंदर पाल सिंग, चार्टर्ड अकाउंटंट प्रवीण कुमार वत्स, क्लेरिजेस हॉटेलचे सीईओ विक्रमादित्य आणि इतर काही लोकांचा समावेश आहे.
ढल्ल आणि सिंह यांनी दारु घोटाळ्याच्या चौकशीमध्ये आरोपींची मदत करण्यासाठी डिसेंबर २०२२ आणि जानेवारी २३ या दोन महिन्यांत वत्स यांना ५ कोटी रुपये दिले होते. सांगवानने ढल्लना अटकेपासून वाचविण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. याचसाठी सांगवानने वस्त याची ईडी अधिकारी खत्री यांची भेट घडवून दिली होती.
यानंतर या दोन महिन्यांत वत्सने ढल्लकडून ५०-५० लाख रुपयांच्या हप्त्यांत ३ कोटी रुपये घेतले होते. यानंतर सांगवानने आणखी २ कोटी रुपये मिळाले तर ढल्लचे आरोपींमधून नाव काढून टाकले जाईल असे सांगितले होते. यानंतर पुन्हा चार हप्त्यांमध्ये २ कोटी रुपये दिले गेले. हे पैसे कॅशमध्ये दिले गेले होते. एवढे पैसे देऊनही ढल्लला १ मार्चला ईडीने अटक केली होती. यावर सांगवानने वत्सला हे आदेश वरून आलेत असे उत्तर दिले होते. यानंतर दिलेले पैसे मागे देण्यासाठी बोलणी सुरु झाली आणि सारे बिंग फुटले.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याचे समजले. ईडीने वत्सच्या घरी रेड टाकली आणि घरातून २.१९ कोटी रुपयांची रोकड आणि १.९४ कोटी रुपयांचे हिऱ्यांचे दागिने सापडले. तसेच त्यांच्या बँक खात्यात २.६२ कोटी रुपये होते. यावर वत्सला ताब्यात घेतले गेले आणि पुढे ईडीच्या अधिकाऱ्यांचे नावही समोर आले.