मुंबई : दादरमधील दादासाहेब फाळके रस्त्यावरील साड्यांसाठीच्या ‘भरतक्षेत्र’ या सुप्रसिद्ध दुकानाशी संबंधित पाच ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी छापे टाकले. स्वत: भागीदार असलेल्या बांधकाम कंपनीतील अन्य भागीदारांची ११३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपप्रकरणी ईडीने ही कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले.
मूळ प्रकरण सन २०१९मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागात दाखल एफआयआरसंबंधी आहे. या एफआयआरनुसार अरविंदलाल शहा यांची स्वत:ची एसबी डेव्हलपर्स नावाची बांधकाम कंपनी आहे. या कंपनीकडे परळ भागातील अब्दुल्ला १, २ व ३ या तीन इमारतींच्या पुनर्विकासाचे काम सन २००६मध्ये आले होते. त्यातील एका इमारतीत तमिळ माध्यमाच्या सरकारी शाळेची लीज होती. ही लीज मोकळी करण्यासाठी शहा यांना ६७ लाख रुपये महापालिकेकडे भरावे लागले. मात्र त्यानंतर त्यांच्याकडे आर्थिक चणचण निर्माण झाली. यावर मार्ग काढण्यासाठी त्यांनी ‘भरतक्षेत्र’ दुकानाचे मालक मनसुख गाला यांच्याकडे आर्थिक निधी उभारणीसाठी धाव घेतली.
गाला हे आर्थिक निधी पुरविण्यास तयार झाले. मात्र, त्यासाठी त्यांनी शहा यांच्या कंपनीत ५० टक्के हिस्सेदारी मागितली. शहा यासाठी तयार झाले. पुढे व्यवसाय वाढविण्यासाठी तसेच कर बचतीसाठी या दोघांनी मिळून एसबी अबोड्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन केली. त्यामध्ये दोन्ही कुटुंबीयांच्या नावे ५०-५० टक्के समभागांसह गाला यांना अध्यक्ष करण्यात आले. याच भागीदारीच्या माध्यमातून फसवणूक झाल्याची तक्रार अरविंदलाल शहा यांनी आर्थिक गुन्हे विभागात केली होती व त्याआधारे आता ईडीकडून तपास सुरू आहे.
यासंबंधी ‘ईडी’ ने याआधी शहा यांचा जबाब नोंदवला होता. त्यानुसार, ‘मनसुख गाला व त्यांचे सीए दिनेश शहा या दोघांनी बनावट कागदपत्रे तयार करून व आपली बनावट डिजिटल स्वाक्षरी करून रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे दस्तावेज दाखल केले. त्याआधारे आपल्या कंपनीतील ५० टक्के हिस्सेदारी २५ टक्क्यांवर आणली गेली आहे. याद्वारे ११३ कोटी रुपयांची फसवणूक झाली’, असे शहा यांनी त्यांच्या जबाबात म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचआधारे हे छापे टाकण्यात आले आहेत.