मुंबई : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेचे नाव आणि पक्षाचे चिन्ह एकनाथ शिंदे गटाकडे आले आहे. यानंतर उध्दव ठाकरेंची कोंडी करण्यासाठी शिंदे गट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पालिकेतील आणि विधानभवनातील कार्यालये ताब्यात घेणार आहे, अशी माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. तसेच येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे गट शिवसेनेचा तांत्रिक भाग मानल्या जाणार आहे. त्यामुळे शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी बजावलेला व्हीप ठाकरे गटाच्या आमदारांना पाळावा लागणार आहे.
अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी बहुमताची गरज असल्याने ठाकरे गटाच्या आमदारांना देखील व्हीप बजावला जावू शकते, याचे पालन न केल्यास त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते. भरत गोगावले म्हणाले, नियमाप्रमाणे पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे त्यांना आमचा व्हीप लागू होणार आहे. यामुळे शिंदे गट व ठाकरे गट यांच्यातील संघर्ष अजूनच चिघळण्याची दाट शक्यता आहे.