रावेर तालुक्यात लांडग्याच्या हल्ल्यात दोन बालकांसह आठ जखमी

तरुण भारत लाईव्ह । पाल ता. रावेर : तालुक्यातील पाल-गारबर्डी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास लांडग्याने अंगणात झोपलेल्या नागरिकांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात आठजण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमींमध्ये दोन बालकांसह चार महिलांचा देखील समावेश आहे.

या हल्ल्यात पाल येथील लक्ष्मण पावरा (८), समाधान पावरा (१२) या बालकांसह कैलाश बूनकर (५८), वेलबाई हारेगा (६५), खावलिबाई बारेला (५०), आनीबाई पावरा (५५), भीमसिंग बारेला (५०) आणि बायजाबाई पावरा (५०) हे जखमी झाले आहेत. जखमींना पाल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली.

नागरिकांनी सतर्क रहावे…

पाल परिसरात झालेल्या या हल्ल्यामुळे रात्री कोणीही बाहेर अंगणात झोपू नये. तसेच याबाबत परिसरात दवंडी देण्यात आली आहे. कदाचित वन्यप्राणी पुन्हा हल्ला करू शकतो. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर झोपू नये. वनविभागातर्फे ट्रॅप कॅमेरे लावण्यात येत आहेत. तसेच रात्रीची गस्त सुरू करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी सतर्क रहावे.

– अमोल चव्हाण, वनक्षेत्रपाल, पाल, ता. रावेर