Eknath Khadse : पुलाच्या कामाची पाहणी केली अन् संतापले, अधिकाऱ्यांना जाब विचारत धरले धारेवर

जळगाव : मुक्ताईनगर ते बोदवड रस्त्यावरील नाडगाव येथे मध्य रेल्वेची रेल्वे क्रॉसिंग असून अलीकडेच उड्डाणपूल उद्घाटनापूर्वीच आमदार चंद्रकांत पाटील यांनी वाहतुकीसाठी खुला केला होता. यावरून राजकारण पेटले असतानाच मंगळवारी आमदार एकनाथराव खडसे यांनी पुलाच्या कामाची पाहणी केली, मात्र पहिल्याच पावसात रस्त्यावरील डांबर वाहून गेल्याने आमदार खडसे यांनी तीव्र संताप व्यक्त करीत याबाबत जाब विचारला.

काय म्हणाले आमदार खडसे?
पुलाचे काम कंत्रादारांकडून अत्यंत सुमार दर्जाचे करण्यात आल्याने अवघ्या पंधरा दिवसात रस्ता जागोजागी उखडला असून कोट्यवधींचा निधी पाण्यात गेल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

अधिकाऱ्यांना विचारला जाब
माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी या उड्डाणपुलाची पाहणी केली असता पुलाचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे केले असल्याचे आढळून आले. पुलावर आणि पोहच रस्त्यावर केलेले डांबरीकरण एका पावसात वाहून गेल्याने जागोजागी खड्डे पडले असुन त्याखालील माती उघडी पडल्याने चिखल झाल्याचे दिसून आले तसेच पुलाची ईतर कामे सुद्धा अपूर्णावस्थेत असल्याने अपघात होउन मोठी हानी होण्याची संभावना आहे.

आमदार एकनाथराव खडसे यांनी मंगळवारी पुलाची पाहणी करून कामाच्या निकृष्ठ दर्जा बाबत सबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले. कामाच्या निकृष्ठ दर्जाबाबत चौकशी करण्यात येऊन कंत्राटदारावर कारवाई करण्याची महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आणि नाशिक विभागाचे दक्षता आणि गुणनियंत्रण विभगाचे अधीक्षक अभियंता आणि इतर संबंधितांकडे लेखी करण्यात आल्याने आता काय कारवाई होते ? याकडे लक्ष लागले आहे.