Eknath Khadse : राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह, जाणून घ्या सर्व काही

जळगाव : अजित पवारांच्या बंडखोरीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवार जवळपास सगळा पक्षच घेऊन शिंदे-फडणवीस सरकारच्या सत्तेत सहभागी झाल्याने त्या पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राजकीय भवितव्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

नेमकी बातमी काय आहे?
काही वर्षांपूर्वी मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेल्या खडसेंनी २०२० मध्ये भाजपला सोडचिठ्ठी देत, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससोबत पाट लावला खरा; पण त्यांना मंत्रिपद मिळण्यापूर्वीच सत्तापालट होऊन खडसेंवर पुन्हा विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली. आता तर अजित पवार जवळपास सगळा पक्षच घेऊन शिंदे-फडणवीस सरकारच्या सत्तेत सहभागी झाल्याने त्या पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सत्तेत येऊन आपले स्वप्न पूर्ण होईल, अशी आशा खडसे यांना वाटत होती; परंतु अचानक झालेल्या घडामोडींमुळे खडसेंची ही आशाही फोल ठरल्यात जमा आहे. शरद पवार यांनी नव्याने पक्षबांधणी करण्याची ग्वाही दिली असली, तरी पवारांना ते कितपत शक्य होईल, याबाबत राजकीय निरीक्षकांना शंका वाटत आहे. अर्थात पवार त्यांच्या मनसुब्यात यशस्वी झाल्यास खडसेंनाही सुगीचे दिवस येऊ शकतात; पण त्यासाठी त्यांना प्रतीक्षाच करावी लागेल.

दरम्यान, अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी घेतलेल्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर आज, मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आकाशवाणी चौकातील कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. यात शरद पवार हेच आमचे चिन्ह आहे. त्यांच्यासोबतच राहणार असल्याचे मत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, महानगराध्यक्षा मंगला पाटील, वाल्मिक पाटील, कल्पना पाटील, प्रतिभा शिरसाठ, विशाल देवकर आदी उपस्थित होते. मुंबई येथील बैठकीला जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी जाणार आहेत. अजीत पवार यांनीही बुधवारी सायंकाळी 5 वाजता बैठक बोलावलेली आहे. या बैठकीलाही उपस्थित राहण्याबाबत फोन आला होता. मात्र, आम्ही शरद पवार यांच्या बैठकीला जाणार आहोत. असे स्पष्ट मत जिल्हाध्यक्ष अॅड.पाटील यांनी व्यक्त केले.