एकनाथ खडसेंनी चालवले सरकारवर टिकेचे बाण, म्हणाले..

भुसावळ : सत्तेवर आलेल्या सरकारला सरकारच्या प्रश्नांवर देणे-घेणे नाही त्यातच सरकारमधील मंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी शेतकर्‍यांविषयी केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी असून मुख्यमंत्र्यांना जर शेतकर्‍यांप्रती संवेदना असल्यास सत्तारांकडून त्या वक्तव्याबाबत खुलासा घ्यावा, असे स्पष्ट माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी येथे व्यक्त केले.

राष्ट्रवादी विधी मंडळातील नेतेपदी निवड झाल्यानंतर रविवारी रात्री 10 वाजता त्यांचे शहरात आगमन झाल्याने फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी खडसे यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला असता त्यांनी सरकारवर टिकेचे बाण चालवले.

आगामी निवडणुकीत पक्षाचे बळ वाढणार
खडसे म्हणाले की, आपली विधी मंडळात गटनेतेपदी निवड झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह संचारला असून या निवडीचा फायदा आगामी काळात पक्षाला निश्चित होणार असून पक्षाचे बळदेखील वाढणार आहे. राज्यातील कापूस उत्पादक संघटीत नसल्याने कापसाला भाव नाही, असेही खडसे यांनी सांगितले. शेतकरी आत्महत्या करतात हे नवीन नाही, या मंत्री अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर त्यांनी आक्षेप नोंदवत सरकारमधील जवाबदार मंत्र्यांनी न शोभणारे विधान केले असून शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारने उपाययोजना करण्याऐवजी असे वक्तव्य करणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.

यांची प्रसंगी उपस्थिती
रविवारी रात्री कारने खडसे हे भुसावळात दाखल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ त्यांची कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. यानंतर रेल्वेने खडसे मुंबईला अधिवेशनासाठी रवाना झाले. प्रसंगी माजी नगराध्यक्ष रमण भोळे, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, माजी नगरसेवक प्रा.सुनील नेवे, पुरूषोत्तम नारखेडे, जि.प.सदस्य रवींद्र नाना पाटील, अ‍ॅड.बोधराज चौधरी, दिनेश नेमाडे, अमोल इंगळे, शफी पहेलवान, मुन्ना तेली, बंटी पथरोड, विशाल नारखेडे, रेहान कुरेशी, दत्तू सुरवाडे, उसामा खान, आर.आर.बावस्कर, शेख, पृथ्वीराज पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.