जळगाव : अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुसरीकडे कापसाला भाव नसल्याने अजूनही मोठ्या प्रमाणात कापूस शेतकर्यांच्या घरातच पडून आहे. याच मुद्यावर बोट ठेवत राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत सरकार जोरदार हल्लाबोल चढविला. अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला आता नुकसान भरपाई द्या अन्यथा शेतकर्याकडे आत्महत्येशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही. यामुळे राज्य शासनाने शेतकर्यांना शंभर टक्के कर्जमाफी देण्याची मागणी विधान परिषदेमध्ये आमदार एकनाथराव खडसे यांनी केले.
शेतकर्यांना आधीच भाव मिळत नाही. कापूस आणि कांदा घरात पडून आहे. त्यातच वाढलेल्या खताचे भाव आणि मजुरांचे भाव यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. आणि आता झालेल्या अवकाळीमुळे तर शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. अशा दुहेरी संकटामुळे अडकल्या शेतकर्याला शंभर टक्के कर्जमाफी मिळायलाच हवी असे यावेळी एकनाथ खडसे म्हणाले.
शेतकर्यांचं हजारो कोटींचे कर्ज माफ करा. निरव मोदी सारखे लोकं पैसे बुडवून गेले मग तुम्ही इथं असलेल्या शेतकर्यांवर अनन्या करु नका, असेही खडसे म्हणाले. शेतकर्यांच्या नुकसानीचे अजुनही पंचनामे नाहीत. मंत्री लक्ष देत नाहीत. आता तलाठी कामावर नाहीत. मग पंचनामे कोण करणार? असा सवाल एकनाथ खडसेंनी विधानपरिषदेत उपस्थित केला.