जालना : शिवसेनेत बंड करुन एकनाथ शिंदे ४० आमदारांसह गुवाहाटीला गेले होते. गुवाहाटीला गेल्यावर काय झाले, याबाबत एकनाथ शिंदे वेगवेगळ्या कार्यक्रमातून खुलासे करताना दिसत आहे. गुवाहाटीला असताना एका अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचा फोन आला आणि त्यांनी चांगले काम करत असल्याचे सांगत आशीर्वाद दिले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
जालन्यातील शेतकरी मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी केलेल्या फोनबाबतची आठवण सांगितली. आम्ही जेव्हा गुहाटीला होतो तेव्हा गुरुजींनी मला आशीर्वाद दिले. मला त्यांनी फोन केला. श्री श्री रविशंकर गुरुजी म्हणाले, अच्छा काम कर रहे हो, असे सांगतानाच बाकी मी काही बोलत नाही. सर्व तुम्हाला माहिती आहे, असे सूचक वक्तवही एकनाथ शिंदे यांनी मंचावरून केले.
श्री श्री रवी शंकर याचे काम खूप मोठे आहे. आम्ही जेव्हा दाओसला गेलो, तेव्हा १ लाख ३७ हजार कोटींची गुंतवणूक आणली. गुरुजी दाओसला देखील आले होते. त्यांनी तिथे ही आशीर्वाद दिला, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. जनतेचे आहे. लोकांचा विकास करणे हाच आमचा ध्यास आहे. आमचा इतर कोणताचा अजेंडा नाही, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.