मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यापासून जनतेसाठी विविध उपक्रम हाती घेतल्याचे चित्र आहे. आता तर यावर्षी राज्यातील दारिद्रयरेषेखालील जनतेची दिवाळी गोड करण्याचा निर्णय ही फडणवीस-शिंदे सरकारने घेतला आहे. दारिद्रयरेषेखालील तब्बल एक कोटी ६२ लाख ४२ हजार शिधापत्रिकाधारकांना अल्पदरात दिवाळी फराळासाठी आवश्यक साहित्य दिले जाणार आहे. त्यांना रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल देण्याची योजना असून, त्यापोटी सरकारी तिजोरीवर सुमारे ५०० कोटींचा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.
दिवाळी तोंडावर आल्याने कमी कालावधीत नागरिकांना या वस्तूंचा पुरवठा करावा, यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने प्रचलित निविदा प्रक्रियेला छेद देत, यावेळी थेट वायदे बाजारातून या वस्तूंची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शनिवारी निविदा मागविण्यात आल्या असून, निविदा दाखल करण्यास दोन दिवसांची मुदत देण्यात आली.
अन्न व नागरी पुरवठा विभागाने एवढय़ा मोठय़ा धान्य खरेदीसाठी निविदा मागविताना केवळ दोनच दिवसांची मुदत कशी दिली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया पारदर्शी होईल का, असा प्रश्न विचारत काही खास ठेकेदारांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची शंका पुरवठादारांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, एवढी मोठी खरेदी पारदर्शीपणे व्हावी आणि लोकांनाही चांगल्या दर्जाच्या वस्तू मिळाव्यात, यासाठीच या वस्तू वायदे बाजारातून खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी दिली.