पुन्हा काय झाडी…काय डोंगार…गुवाहाटीला रवाना होताना काय म्हणाले एकनाथ शिंदे

मुंबई : काही महिन्यांपुर्वी राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीत सर्वाधिक चर्चे राहिलेल्या गुवाहाटीची पुन्हा एकदा चर्चा सुरु आहे. याचं कारण म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या समर्थक मंत्री, आमदार, खासदारांसह शनिवारी सकाळी विशेष विमानाने गुवाहाटीला रवाना झाले आहेत. या दौर्‍यात मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांसह मंत्री, आमदार आणि खासदारांचे कुटुंबीयही सहभागी होणार आहेत. हे सगळे कामाख्या देवीचे दर्शन घेणार असून आसाम सरकारचा पाहुणचारही घेणार आहेत.

गुवाहाटील रवाना होण्याआधी एकनाथ शिंदे यांनी विमानताळावर माध्यमांशी संवाद साधला. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं होतं. आम्ही गुवाहाटीवरून घाई गडबडीत आलो होतो. त्यामुळे आता आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणानुसार जात आहे. श्रद्धेने जात आहे. त्यात कुणाला काही वाटण्याची अवश्यकता आहे, असं वाटत नाही, असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

कामाख्या देवीने आमची इच्छा पूर्ण केली. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील सरकार स्थापन झालं. त्यामुळे देवीकडे आणखी काही मागण्याची गरज नाही. राज्यातील बळीराजाला सुखी होऊ दे, जनतेच्या जीवनात अमूलाग्र बदल होऊ दे, राज्यावरील अरिष्ट जाऊ दे ही प्रार्थना करणार आहे. ही प्रामाणिक भावना आहे. हाच आमचा अजेंडा आहे, असल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.