Eknath Shinde Meets Narendra Modi: कुटुंबाची इच्छा होती; भेटीत नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली : कुटुंबाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची इच्छा होती. यावेळी राज्यात सुरू असलेले प्रकल्प, धारावी प्रकल्प, राज्यातील पावसाची परिस्थिती याबाबत मोदींनी चर्चा केल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात एक बैठक पार पडली. एकनाथ शिंदे यांनी सहपरिवार नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाल्या. त्यात इर्शाळवाडी येथील घटनेबाबत नरेंद्र मोदी यांनी संवेदना व्यक्त केल्या. राज्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत देखील मोदी यांनी जाणून घेतले. मोठ्या प्रकल्पांवर देखील मोदी यांनी चर्चा केली. केंद्राचे नेहमी राज्याला पाठबळ असते. बंद प्रकल्पांना आम्ही चालना देली, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मेट्रो, कारशेट, बुलेट ट्रेन तसेच मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाबाबत नरेंद्र मोदी यांच्याशी मी चर्चा केली. कोकणातील समुद्रात जाणारे पाणी दुष्काळग्रस्त भागांकडे वळवता येईल. यावर शासन गांभीर्याने काम करत आहे, ही बाब मोदींच्या कानावर घातल्याचे शिंदे म्हणाले.

गृहमंत्री अमित शाह यांना देखील भेटणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच मोदींना भेटून माझ्या वडिलांना चांगले वाटले. माझ्या नातवासोबत मोदी खेळल्याचे शिंदे यांनी सांगितले. पुन्हा मोदी सरकार सत्तेत येतील. देशभरातील लोकांना असे वाटते, असे देखील शिंदे म्हणाले.