अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ…शिंदेंच्या दौैर्‍याची जय्यत तयारी

अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या आमदारांसह ९ एप्रिल रोजी अयोध्या दौर्‍यावर जाणार आहेत. या दौर्‍यानिमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर या दौर्‍याला प्रचंड महत्व असल्याने अयोध्या दौर्‍याची जय्यत तयारी सुरु आहे. दरम्यान, अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ…; असा नारा देत अयोध्या दौर्‍याचा पहिला टीझर जारी करण्यात आला आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या चरणी धनुष्यबाणाची महापूजा केली जाईल आणि त्यानंतर महाराष्ट्रभरातील विविध जिल्हे आणि तालुक्यांमध्ये हा धनुष्य जनतेपर्यंत फिरवला जाईल, अशी योजना शिंदे गटाने आखल्याचे सांगितले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्येत लावल्या गेलेल्या बॅनरवर, चलो अयोध्या प्रभू श्रीरामजी का सन्मान, हिंदुत्व का तीर कमान असा मजकूर लिहिण्यात आला आहे. तसेच यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभू रामाचे फोटो आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे फोटो आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही भला मोठा फोटो आहे. यासह अयोध्येत शिवसेनेचे झेंडेही लावण्यात आले आहेत. संपूर्ण परिसर भगवामय झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या टीझरमध्ये महाराष्ट्रात रामराज्य, महाराष्ट्र एक सुशासित राज्य असल्याचे दर्शवण्यात आले आहे. सामान्य जनता हा एक परिवार आहे, जनतेची सेवा, मानव सेवा सर्वोपरि आहे, असे या टीझरमध्ये सांगण्यात आले आहे. भगव्याला कधीही डावलले जाणार नाही, अशी ग्वाही देत, रग रग में राम, कण कण में अशा प्रकारे ओळी वापरून हिंदी भाषेतून हा टीझर बनवण्यात आलाय. तर सर्वांत अखेरीस अयोध्या में शंखनाद आ रहे है एकनाथ अशी टॅगलाइन देण्यात आली आहे.