मुंबई : अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. राज ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्यातील ही सहावी भेट आहे. या भेटीमुळे राज ठाकरे-एकनाथ शिंदे एकत्र येणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. यापार्श्वभूमीवर मनसेच्या एका मोठ्या नेत्याने एक विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हटलं की, आत्ताचे मुख्यमंत्री भेटतात. आधीचे मुख्यमंत्री कुणाला भेटत नव्हते. राज्यातील प्रश्नांबाबत राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटतात. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आपण राजकारणात असतो. त्यामुळे या भेटीतून जनतेचे प्रश्न सुटत असतील तर काही वावगं नाही. राजकारणात कधी काय होईल हे आज सांगता येणार नाही. २०२४ मध्ये काय दडलंय हे माहिती नाही. महाराष्ट्राच्या हिताचा आणि हिंदुत्वाच्या हिताचा निर्णय राज ठाकरे योग्यवेळी घेतील. त्याचसोबत मराठी माणसाच्या हिताचा निर्णय असेल असं त्यांनी म्हटलं आहे.
बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा राज ठाकरेंकडे आहे. बाळासाहेबांचे विचार, महाराष्ट्राबद्दलची स्वप्नं, हिंदुत्वाची कास राज ठाकरेंकडे आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी दोन मोठे नेते एकमेकांना भेटत असतील तर त्यात वावगं नाही. लोकसभा, विधानसभेसह सगळ्या निवडणुका २०२४ मध्ये आहेत. त्याबाबतही चर्चा झाली असेल तर काहीच नाही, असंही त्यांनी नमूद केले.