मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, नवाब मलिक देशद्रोहीच…

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी चहापानावरुन विरोधकांवर टीका केली होती. देशद्रोह्यांबरोबर चहापान टळलं, अशी टीका त्यांनी केली होती. यावर विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात आली होती. शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना देशद्रोही म्हटले, असा आरोप विरोधकांनी केला. यावर उत्तर देत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा विधानपरिषदेत आपली भूमिका मांडली. मी अजित पवार यांना नाही तर नवाब मलिक यांना देशद्रोही म्हटलं होतं. मलिक यांना देशद्रोही म्हणणं गुन्हा असेल तर हा गुन्हा मी पुन्हा पुन्हा करेल, अशी भूमिक मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली.

महाराष्ट्र विधीमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी सुरु आहे. आज सत्ताधारी व विरोधक विशेषत: ठाकरे गट यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक चकमक उडाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्युत्तर देत असताना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी जोरदार टीका केली. अडीच वर्ष महाविकास आघाडीसोबत सत्ता उपभोगत असताना शिंदे यांना मलिक देशद्रोही वाटले नाहीत का?

त्याआधी देवेंद्र फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री होते, तेव्हाही मलिक देशद्रोही असल्याचे त्यांना कळले नाही का? अशी जोरदार टीका अनिल परब यांनी केली. अनिल पराब यांनी आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावर कारवाई झाल्यानंतर त्यांच्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मनात प्रतिकूल मत होते, मात्र त्यांना निर्णय घेण्यास अडचण होती, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.