Eknath Shinde । राज्यासह जळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या रणधुमाळीला वेग आला आहे. दोन-तीन दिवसांपूर्वीच धुळे व नाशिक जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या, तर सहकार व गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा पार पडल्या. तसेच अन्य पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या सभा घेण्यात येणार आहेत.
सोमवारी उद्धव ठाकरे यांची चाळीसगाव येथे, तर पारोळा व मुक्ताईनगर येथे शरद पवार यांची सभा झाली असून, राष्ट्रीय व राज्य पातळीवरील नेत्यांचा मुक्काम मात्र जळगाव शहरात राहणार आहे. त्यामळे सर्वच राजकीय नेत्यांनी जळगाव शहरासह जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसून येत आहे. जळगाव जिल्हा गेल्या पाच पंचवार्षिकपासून भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. २०१४ मध्ये भाजपचे ६, तर शिवसेनेचे ३. राष्ट्रवादी काँग्रेस १ आणि अपक्ष १ असे आमदार जिल्ह्यात होते.
२०१९ च्या निवडणुकीत अमळनेर, रावेर, मुक्ताईनगरच्या जागांवर भाजपचा पराभव झाला होता. असे असूनही २०२४ च्या निवडणुकीत मुक्ताईनगर आणि अमळनेर येथील जागा भाजपाने मित्र पक्षांना दिल्या आहेत. दरवेळेपेक्षा जळगाव जिल्ह्यात या वेळी भाजप दोन जागा कमी लढवित आहे. गतवेळी ज्या पाच जागांवर भाजपने विजय मिळवला होता, त्या जागांवर पुन्हा विजय मिळवणे भाजपसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शतप्रतिशत यश मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
पक्षफुटीनंतर अस्तित्वाची लढाई
कोरोना काळातील तॉकडाऊन मार्च २०२२ नंतर संपुष्टात आले. त्यानंतर अवघ्या दोन-तीन महिन्यातच जून अखेर शिवसेनेत बंड होऊन फूट पडली. यात जिल्ह्यातील पाचही शिवसेनेचे आमदार शिंदे गटाकडे गेले. यामुळे संघटनेवर मोठा परिणाम झाला. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात उद्धव सेना चार जागा लढवित असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या दोन सभा जिल्ह्यात आहेत. याअगोदर उमेदवारी, निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या काळात पाचोरा येथे आदित्य ठाकरेंचीही एक सभा झाली. त्यामुळे उबाठा गटासाठी ही निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई असल्याचे दिसून येत आहे.
सर्वच पक्षांचे लक्ष जळगाववर
सोमवारी शरद पवार यांच्या चार, तर उद्धव ठाकरे यांच्याही दोन सभा पार पडल्या. पक्षफुटीनंतर प्रथमच शरद पवार जळगावात जैन हिल्स येथे शहरात मुक्कामी थांबणार आहेत.
मुख्यमंत्री आज जिल्ह्यात
याशिवाय मंगळवार, १२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाचोरा आणि चोपडा येथे उमेदवारांच्या प्रचार सभांसाठी दाखल होत असून तेदेखील मुक्कामी थांबणार आहेत. उबाठा गटाचे खासदार संजय राऊत हेदेखील प्रचार सभेच्या निमित्ताने आगामी आठवड्यात जळगावात मुक्कामी राहणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांकडून जळगावमधील ११ जागांसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत.
अजित पवार गट
जिल्ह्यात २०१४ पूर्वी मुक्ताईनगर व जळगाव वगळता राष्ट्रवादीच्या ९ जागा होत्या. मात्र, २०१४ च्या मोदी लाटेत राष्ट्रवादीला एरंडोलची जागा टिकविता आली, तर २०१९ मध्ये अमळनेरमधून अनिल पाटील निवडून आले होते. शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीमध्ये फूट पडून दोन गट झाले. आमदार अनिल पाटील अजित पवार गटाकडे गेले. ही एकमेव जागा अजित पवार गटाला आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९९९ पूर्वी असलेली काँग्रेसची ताकद जिल्ह्यात कमी होऊन २०१९ मध्ये केवळ १ जागा लढवत जिंकून आणली. २०२४ च्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ही जागा मिळवण्यात यश मिळवले असून विधानसभेतही बळ टिकवून ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस नेत्यांच्या मात्र सभा अजून जळगाव जिल्ह्यात झालेल्या नाहीत. उमेदवाराला स्वतःच प्रचारासाठी जागा राखण्यासाठी जीव तोडून हिंडावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे