ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज 60 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यभरातून विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांनीदेखील त्यांना खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे भरभरून कौतुक केले.
आशा भोसले यांनी “तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार” हे गाणं गात एकनाथ शिंदेंना शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, “मी तुमच्यासाठी गातेय…तुमचा वाढदिवस आहे. तुम्ही मला फार आवडता. तुम्ही अचानक वर आलात. आम्हाला माहित नव्हतं तुम्ही किती मेहनत करता. ज्याप्रमाणे बाळासाहेबांनी शिवसेना घडवली, तसाच अभिमान तुम्हा वाटतो. तुम्ही कठीण प्रसंगात खंबीर राहिलात, यशस्वी झालात आणि भविष्यातही यश मिळवणार आहात. मी तुमच्यापेक्षा मोठी आहे, तुम्हाला आशीर्वाद देतेय – असेच काम करत राहा!”
हेही वाचा : ‘घटस्फोट घेऊ’, म्हणत न्यायालय गाठलं अन् पत्नी आणि मुलांसमोरच… घटनेनं खळबळ
एकनाथ शिंदे यांनी आपल्या ठाणे येथील शुभ-दीप निवासस्थानी कुटुंबीयांसोबत साधेपणात वाढदिवस साजरा केला. पत्नी लता शिंदे आणि सून वृषाली शिंदे यांनी त्यांचे औक्षण करत शुभेच्छा दिल्या. नंतर संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन केक कापला.
अमित शहा आणि महायुतीच्या नेत्यांकडून शुभेच्छा
देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही एकनाथ शिंदेंना वाढदिवसानिमित्त विशेष शुभेच्छा दिल्या. तसेच महायुतीतील अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना शुभेच्छा संदेश पाठवले.
हेही वाचा : दारू पाजली अन् केला जबरदस्तीचा प्रयत्न; नकार दिल्याने… नागपुरात अमानवीय कृत्य
आपल्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंनी सोशल मीडियावर “कॉमन मॅन का हाथ, एकनाथ शिंदें के साथ…” असे लिहित एक भावनिक पोस्ट शेअर केली.
त्यात ते म्हणाले, “मुख्यमंत्री असताना मी नेहमी म्हणायचो की मी ‘सीएम’ म्हणजे ‘मुख्यमंत्री’ नसून #कॉमन_मॅन आहे. आता उपमुख्यमंत्री झाल्यावर मी ‘डीसीएम’ म्हणजे ‘डेडीकेटेड टू कॉमन मॅन’ आहे. आज माझ्या वाढदिवसानिमित्त एका सहृदयाने मला ही अनोखी भेट दिली – ख्यातनाम व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या ‘कॉमन मॅन’ने मोठ्या विश्वासाने माझ्या खांद्यावर हात टाकलेला आहे. हा हात म्हणजेच माझ्यासाठी सतत जनतेसाठी काम करण्याची प्रेरणा आहे.”
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस राज्यभरात विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे.