ठाणे : “राजकारणात मन मोठं असावं लागतं, पण मला एक पुरस्कार काय मिळाला आणि यांची जळफळाट सुरू झाली,” अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केल्यानंतर शिंदे माध्यमांशी संवाद साधत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, “शरद पवारांनी राज्याची संस्कृती दाखवली, पण उद्धव ठाकरेंनी विकृती दाखवली.” महादजी शिंदे आणि साहित्यिकांचा अपमान झाला, तो कोणी केला? ज्यांना शरद पवारांनी मुख्यमंत्री केलं त्यांनीच हा अपमान केला, असंही शिंदेंनी स्पष्ट केलं.
“शरद पवार साहेब परिपक्व नेते आहेत. त्यांच्यावर अविश्वास दाखवणे दुर्दैवी आहे. एका पुरस्कारामुळे एवढा जळफळाट होण्याचं कारण काय?” असा सवाल शिंदेंनी केला. ते पुढे म्हणाले, “राजकारणात मोठं मन असावं लागतं. आम्ही कधीही कमरेखाली वार केले नाहीत किंवा कोणाबद्दल वाईट बोललो नाही.”
ठाकरे गटाचे काही खासदार शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या घरी जेवणासाठी गेल्याने ठाकरे गट नाराज आहे. यावर शिंदे म्हणाले, “हे आपल्या खासदारांवरच अविश्वास दाखवत आहेत. याआधी माझ्यावरही असा अविश्वास दाखवला गेला आणि माझंही खच्चीकरण केलं गेलं होतं.”
शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर निशाणा साधत सांगितलं, “शरद पवारांनी आपल्या पुस्तकातही लिहिलंय की घरी बसून काम होत नाही. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी आणि मी काय काम केलं याची माहिती शरद पवारांनाही आहे.” तसेच, “दिल्लीसमोर गुडघे टेकणार नाही म्हणणारे आता दिल्लीत काय करताय?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राजन साळवींचा शिंदे गटात प्रवेश
मातोश्रीशी एकनिष्ठ समजल्या जाणाऱ्या कोकणातील नेते आणि माजी आमदार राजन साळवी यांनी आज उद्धव ठाकरेंना रामराम करत शिंदेंचा झेंडा हाती घेतला. ठाण्यातील आनंदाश्रम येथे त्यांनी मशाल खाली ठेवत धनुष्यबाण हाती घेतला. शेकडो समर्थकांसह शक्तिप्रदर्शन करत त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
भावूक होत साळवी म्हणाले, “जुनी शिवसेना सोडताना दुःख आहे, पण जुन्या सहकाऱ्यांसोबत नव्या शिवसेनेत प्रवेश होत असल्याचा आनंदही आहे.” साळवींच्या या प्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे राजकीय विश्लेषक मानत आहेत.