एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, राजस्थानच्या माजी मंत्र्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आपआपल्या पक्षांचा विस्तार करत आहेत. महाराष्ट्रात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पक्ष विस्तारावर लक्ष केंद्रीत केले आहे. ठाकरे गटासह काँग्रेस-राष्ट्रवादीतून नेत्यांची आयात झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थानमध्ये त्यांच्या पक्षाचा विस्तार करत असल्याचं पाहायला मिळत आहे. शनिवारी शिंदेंच्या जयपूर दौऱ्यात राजस्थानचे माजी मंत्री आणि काँग्रेस आमदारानेच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. राजस्थानचे निलंबित मंत्री आणि काँग्रेसचे आमदार राजेंद्रसिंह गुढा यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजेंद्रसिंह यांचा मुलगा शिवम गुढा याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शिंदे त्यांच्या गावी गेले. यावेळी गुढांच्या शिवसेना प्रवेशाचा कार्यक्रम झाला. एकनाथ शिंदे जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन राजस्थानसाठी त्यांच्या पक्षाच्या विस्ताराची योजना सांगतील. राजस्थान विधानसभा निवडणुकीत शिवसेना काही जागा लढवू शकते. गुढा आता भाजपसोबत युती असलेल्या शिवसेनेच्या कोट्यातून एक जागा मागू शकत असल्याने ही एक महत्त्वाची घडामोड म्हणून पाहिली जात आहे. माझा आशीर्वाद नसता, तर गहलोत कधीच मुख्यमंत्री झाले नसते, असा दावा गुढा यांनी नुकताच केला होता. मला वसुंधरा राजेंनी तुरुंगात टाकलं, अन् त्यांच्या बातम्या येणंच थांबलं, त्यामुळे गहलोतांनी मला जेलमध्ये टाकलं, तर त्यांच्याही चर्चा बंद होतील, असं गुढा म्हणाले होते. २४ जुलै रोजी विधानसभेत लाल डायरी झळकवल्याबद्दल बडतर्फ झालेल्या गुढा यांची विधानसभेतून हकालपट्टी करण्यात आली होती.