मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या मुलावर मनमानी कारभाराचा आरोप करत मुंबईतील कांदिवली, चारकोप आणि मालाड येथील ४० पदाधिकाऱ्यांनी गेल्याच आठवड्यात राजीनामे सुपूर्द केले होते. हा प्रकार ताजा असतानाच आता पुन्हा एकदा शिवसेनेत नाराजी नाट्य रंगले आहे. खुद्द रामदास कदम यांच्याविरोधातच ३०० पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईतील शिवसेनेच्या अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी आणि गोरेगाव भागातील जवळपास ३०० नाराज पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. शिवसेना नेते रामदास कदम आम्हाला शिवीगाळ करतात, आम्हाला पक्षातून काढून टाकण्याची धमकी देतात, असा आरोप या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला.
‘रामदास कदम यांना हटवा अन्यथा आम्ही आमच्या पदाचे राजीनामे देतो’ असा इशाराही या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. मात्र त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सबुरीचा सल्ला देत नाराज पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेतली. तसेच त्यांना राजीनामे न देण्याचे आवाहनही केले.