धडगाव : प्रवासात आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अशीच एक घटना पुन्हा धडगाव तालुक्यात घडली आहे. शहादा येथून धडगावकडे जाणार्या बसमधील 79 वर्षीय वयोवृद्ध प्रवाशाचा मृत्यू झाला. सिंगा कुत्र्या पाडवी (79 ) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्यापही स्पष्ट झालं नसल्याची माहिती बस वाहक शांताराम दांडगे यांनी दिली.
धडगाव तालुका दुर्गम भाग असल्याने बराच प्रवास घाटातून होत असतो. बस व खाजगी प्रवाशी वाहने वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत असते. नंदुरबार जिल्ह्यातील शहादाहुन धडगाव कडे जाणार्या बस (क्र. एम.एच.20,बी.एल. 3562) या गाडीत सिंगा कुत्र्या पाडवी (79 ) हे वयोवृद्ध प्रवाशी प्रवास करीत होते. त्यांची तब्येत खराब होत असल्याचे बस वाहक याना समजताच तात्काळ त्यांनी बस थेट धडगाव तालुक्यातील मांडवी प्राथमिक उपचार केंद्रावर नेत सिंगा पाडवी यांना उपचारासाठी दाखल केले.
परंतु त्याअगोदरच त्यांच्या मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळे चालत्या बसमध्येच त्यांचा मृत्यू झाल्याचे अंदाज व्यक्त केल्या जात आहे. सिंगा कुत्र्या पाडवी हे वयोवृध्द शहादा तालुक्यातील पिंपरापाणी येथील रहिवासी होते दरा गावं येथून ते बसमध्ये बसले होते आणि घाटात त्यांची तब्येत बिघडली होती. सिंगा पाडवी यांचा मृतदेह धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.