निवडणूक आयोगाचा राज्य सरकारला धक्का; वाचा सविस्तर…

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं ज्या अधिकाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे त्यांची बदली करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारनं मुंबई महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त यांना त्यातून वगळण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली होती. मात्र, निवडणूक आयोगानं राज्याचा प्रस्ताव फेटाळला आहे.  यामुळे राज्य  सरकारला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या दणक्यानंतर आता मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि पी. वेलारसू यांची बदली करावी लागणार आहे.

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांची मुंबई महापालिकेत ३१ मे २०२४ रोजी चार वर्ष पूर्ण होतील.  मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि पी. वेलारसू यांची देखील तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. राज्य सरकारनं २६ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहून अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भातील निकषातून मुंबई महापालिका आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त यांना वगळण्याची विनंती केली होती.

भारतीय निवडणूक आयोगाचे सचिव यांनी राज्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांच्या २६ फेब्रुवारीच्या पत्राला उत्तर देताना आपण पाठवलेलं पत्र निवडणूक आयोगाच्या डिसेंबर २१ सूचनांचं पालन करत नसल्याचं म्हटलं आहे. निवडणूक आयोगानं डिसेंबर २१ च्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणं मुख्य निवडणूक अधिकारी, मुख्य सचिव आणि समकक्ष अधिकाऱ्यांनी तीन वर्ष पूर्ण केली असतील त्यांची ३१ जानेवारीपूर्वी बदली करण्याचे आदेश दिले होते.