इलॉन मस्कने गमावले 10,35,03,83,40,000 रुपये

नवी दिल्ली : टेस्ला, स्पेसएक्स आणि ट्विटरचे सीईओ इलॉन मस्क यांच्यासाठी गुरुवारचा दिवस खूपच वाईट होता. त्यांची स्पेस कंपनी स्पेसएक्सचे रॉकेट उड्डाणानंतर काही मिनिटांतच निकामी झाले. दरम्यान, गुरुवारी इलेक्ट्रिक कार बनवणार्‍या कंपनीचे शेअर्सही सुमारे १० टक्क्यांनी घसरले. यामुळे, मस्कची एकूण संपत्ती १२.६ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे १०,३५,०३,८३,४०,००० रुपयांनी घसरली. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, मस्कची एकूण संपत्ती आता १६४ अब्ज डॉलर इतकी आहे.

या वर्षी त्यांची एकूण संपत्ती २६.८ अब्ज डॉलरने वाढली असून जगातील श्रीमंतांच्या यादीत ते दुसर्‍या क्रमांकावर आहेत. यावर्षी सर्वाधिक कमाईच्या बाबतीत ते तिसर्‍या क्रमांकावर आहेत. टेस्लाचे शेअर्स गुरुवारी ९.७५ टक्क्यांनी घसरले. यासह, टेस्लाचे मार्केट कॅप ५१६.५६ अब्ज डॉलर इतके कमी झाले आहे आणि जगातील शीर्ष कंपन्यांच्या यादीत ते नवव्या स्थानावर घसरले आहे.

अदानी-अबांनींसह हे आहेत टॉप १०

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, फ्रान्सचे बर्नार्ड अर्नॉल्ट २११ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. जेफ बेझोस १२८ बिलियन डॉलरसह तिसरे, बिल गेट्स (१२२ बिलियन डॉलर) चौथ्या, वॉरेन बफे (११४ बिलियन डॉलर) पाचव्या क्रमांकावर आहेत. लॅरी एलिसन १०७ बिलियन डॉलर) सहाव्या, स्टीव्ह बाल्मर (१०१ बिलियन डॉलर) सातव्या, लॅरी पेज (९७.५ बिलियन डॉलर) आठव्या, फॅनोइस बेटनकोर्ट मायर्स (९३.३ अब्ज डॉलर) नवव्या आणि सर्जी ब्रिन (९३.३ अब्ज डॉलर) दहाव्या क्रमांकावर आहेत. या यादीत मुकेश अंबानी ( ८१ बिलियन डॉलर) १२ व्या आणि गौतम अदानी (५९.१ बिलियन डॉलर) २१ व्या क्रमांकावर आहेत.