मुंबई : लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल दुखातीमुळे आयपीएलमधून बाहेर झाला आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरु आहेत. याचदरम्यान के.एल. राहुलने भावनिक पोस्ट लिहली असून यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच BCCI चे देखील आभार मानले आहे. विशेषतः दुखापतीमुळे के एल राहुल आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC Final 2023) अंतिम सामन्याला देखील मुकणार आहे.
के एल राहुल काय म्हणाला?
काळजीपूर्वक विचार केल्यानंतर आणि वैद्यकीय टीमशी सल्लामसलत केल्यानंतर, असे समोर आले की, माझ्या मांडीवर लवकरच शस्त्रक्रिया केली जाईल. त्यामुळे आगामी काही दिवस मला विश्रांतीची गरज आहे. हा निर्णय घेणे खरोखर कठीण आहे, परंतु मला माहिती आहे की, ठीक होण्यासाठी हा निर्णय योग्य आहे.
तसेच लखनौ सुपर जायंट्सच्या संघाचा कर्णधार या नात्याने यावेळी संघासोबत नसल्याने खूप वेदना होत आहेत. पण मला खात्री आहे की, माझ्या संघातील शिलेदार या प्रसंगाला सामोरे जातील आणि नेहमीप्रमाणे त्यांची सर्वोत्तम कामगिरी करतील. मी पुढच्या महिन्यात भारतीय संघासोबत ओव्हलवर नसणार हे पूर्णपणे निराशाजनक आहे. ब्ल्यू जर्सीत पुनरागमन करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असेही राहुलने म्हटले.
राहुलने बीसीसीआयचे आभार मानताना म्हटले की, मला सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे, ज्यांनी मला परत येण्याचे बळ दिले. लखनौच्या संघाचे व्यवस्थापन आणि BCCI त्यांच्या तत्परतेबद्दल तसेच पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार. “मी लवकरच मैदानात परत येण्याची आशा करतो. गेले काही दिवस खरोखरच कठीण गेले आहेत, परंतु मी पुनरागमन करण्याचा निर्धार केला आहे. दुखापती कधीच सोप्या नसतात, पण मी नेहमीप्रमाणेच देशासाठी माझे सर्व काही देईन. सर्व समर्थन आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद”, असे राहुलने अधिक म्हटले.