कर्मचाऱ्यांचा संप मागे : मात्र… चित्रा वाघ यांची कारवाईची मागणी, काय प्रकरण?

मुंबई :  राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी ‘जुनी पेन्शन योजना’ लागू करावी, या मागणीसाठी १४ मार्च पासून बेमुदत आंदोलन पुकारले होते. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत २० मार्चला  शिष्टमंडळाची चर्चा झाली. दरम्यान, या बैठकीत सरकारने आमच्या मागण्यांवर सकारात्मकता दाखवली असून राज्यात जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावानं लागू होईल, असा दावा कर्मचारी नेते विश्वास काटकर यांनी केला. तसे लेखी आश्वासन सरकारने दिल्याचंही काटकर यांनी सांगितलं. मुख्यमंत्री यासंदर्भातील निवेदन विधानसभेत करतील. संप मिटल्याने उद्यापासून कर्मचारी कामावर हजर राहतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

त्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. मात्र आता नवीन वाद निर्माण झाला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एका महिला कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूती ठेवली तरी या संपाच्या आडून आपला अजेंडा चालविणारे महाभाग आहेत तरी कोण?, असा प्रश्न भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

https://t.co/QGvHQN7Z7w

काय म्हणाल्या चित्रा वाघ? 
चित्रा वाघ म्हणाल्या, संपातील १ महिला कर्मचारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबावर अत्यंत खालच्या पातळीवर बोलली तिच्यावर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे. आपल्या प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी संविधानाने दिलेले हत्यार आहे पण त्यात हे असं वक्तव्य एखादी “सटवी”च करू शकेल.

फेसबुकवर दुसऱ्याची पोस्ट शेअर केली म्हणून मागच्या सरकारने एका मुलीला थेट तुरूंगात पाठवले. इथे तर थेट हातात माईक घेऊन अपशब्द बोलले गेले हा देशाचे पंतप्रधान व राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपमान नाही का? पोलिसांनी स्युमोटो अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या, सरकारी यंत्रणेतील हे राजकीय पाताळ षडयंत्री एकतर संघटनेने शोधून बाजूला सारावे नाहीतर राज्याच्या मुख्य सचिवांनी तरी त्यांना घरी बसवावे. आम्ही शोध घेतला तर सापडायला फार वेळ लागणार नाही त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे!