रोजगार म्हणजे नोकरी का?

वेध

– नंदकिशोर काथवटे

भारतात प्रचंड बेरोजगारीची समस्या आहे. दिवसेंदिवस ही समस्या वाढत असून बेरोजगारीला केवळ सरकारच जबाबदार आहे. अशाच बातम्या आजवर कानी पडत होत्या. मात्र, आता मोदी सरकारच्या काळात एकाच वेळी हजारो युवकांना रोजगार दिला जात आहे. या बातमीची मात्र कुणी प्रशंसा करणार नाही; उलट सरकारचे कामच आहे नोक-या देण्याचे, असे म्हणून सरकारच्या प्रयत्नांकडे आपण दुर्लक्ष करतो. मागील वर्षी २२ ऑक्टोबर रोजी मोदी सरकारने भव्य रोजगार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याच्या माध्यमातून हजारो युवकांना त्यांच्या कुवतीप्रमाणे रोजगार देण्याचा प्रयत्न झाला होताआज केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७१ हजार युवकांना रोजगार दिला जाणार आहे. रोजगार म्हणजे प्रत्यक्षात नियुक्त्यांचे पत्रच युवकांच्या हाती सोपविले जाणार आहे या महामेळाव्यात ट्रेन मॅनेजरपासून तर प्राध्यापक, शिक्षक यासारख्या पदांच्या नोक-या युवकांना मिळणार आहेत. तरी देखील बेरोजगारीचे खापर सरकारवर फोडायला विरोधक कमी करणार नाहीत.

राजकारणासाठी एखाद्या गोष्टीला विरोध करणे किंवा टीकाटिप्पणी करणे हे समजू शकतो. मात्र, एखाद्या सरकारने जनहितासाठी काही चांगली कामे केल्यास त्या कामाचेदेखील कौतुक करायला पाहिजे. युवकांना रोजगार देणे ही सरकारची जबाबदारी नक्कीच आहे, हे नाकारून चालणार नाही. मात्र, सतत बेरोजगारीच्या नावाने ढोल बडविणा-यांनी युवकांसाठी रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. मोदी सरकारच्या आजच्या रोजगार मेळाव्यात ग्रंथपाल, नर्स, प्रोबेशनरी अधिकारी, कर निरीक्षक, सहायक प्राध्यापक, पर्यवेक्षक, अकाऊंटंट, आयकर निरीक्षक, स्टेनोग्राफर, पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, लिपीक, स्टेशन मास्तर याशिवाय इतरही वेगवेगळ्या पदांच्या नोक-या बेरोजगारांना दिल्या जाणार आहेत. म्हणजेच ७१ हजार युवकांना उद्या रोजगाराचे नियुक्तिपत्र हाती मिळणार आहेत. केंद्र सरकारचे या निमित्ताने कौतुक झालेच पाहिजे. कारण, एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच दिवशी नोक-या देण्याचा विक्रम मोदी सरकारशिवाय दुसरे कुणी करू शकले नाही. बेरोजगार युवकांना नोक-या बहाल करून मोदी सरकारने बेरोजगारीच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे.

पण या निमित्ताने प्रश्न विचारला जातो की, रोजगार म्हणजे केवळ नोकरीच होय का? प्रत्येकाला रोजगार म्हणजे आपल्याला लठ्ठ पगाराची नोकरी हवी असेच वाटते. मात्र, सरकारलासुद्धा नोक-या देताना काही मर्यादा आहेत. किती युवकांना आपण नोक-या वाटणार आहोत. एक दिवस शासकीय नोक-या मिळणे कठीण होऊन बसेल; अशावेळी काय करणार आहोत आपण. रोजगार म्हणजे केवळ नोकरी नसून व्यवसायातूनही रोजगार उभा करता येतो. युवकांनी व्यवसायाकडे वळल्यास त्यांच्यातून चांगलेउद्योगपती निर्माण होऊ शकतील आणि एक उद्योगपती युवक शेकडो लोकांच्या हाताला काम देऊ शकेल. हळूहळू बेरोजगारी कमी होऊन प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल.मात्र, जो तो आज आपल्याला शासकीय नोकरीच मिळावी यासाठी प्रयत्नशील असतो आणि समाजातही ज्याला नोकरी आहे, त्यालाच रोजगार आहे असे मानले जाते. मात्र, एक चांगला युवक व्यवसायाच्या माध्यमातूनही रोजगार उभा करू शकतो, यावर लोकांचा विश्वास नसतो. स्पर्धेच्या युगात व्यवसायातून रोजगार निर्माण करणे कठीण आहे.

मात्र, जे या ध्येयाने झपाटले आहेत त्यांनी आपला रोजगार उभा केला आहे आणि त्या माध्यमातून हजारो लोकांच्या हाताला काम दिले आहे. त्या सर्व युवा उद्योगपतींचे खरंच अभिनंदन. यावेळी मोदी सरकारने ७१ हजार युवकांना रोजगार दिला, म्हणजे नोक-या दिल्या आहेत.मात्र, या नोक-या मिळविणे सामान्यांसाठी पुढे जाऊन कठीण होत जाईल. त्यामुळे व्यवसायातूनही सरकारला रोजगार उभा करता आला पाहिजे आणि त्या रोजगाराच्या माध्यमातून युवकच युवकांना रोजगार देऊ शकतील, अशी व्यवस्थाही सरकारला उभी करावी लागेल. ज्या युवकांना नोक-या नाहीत त्या युवकांना जीवन जगताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणून अशा युवकांसाठीसुद्धा व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याची गरज आहे. प्रत्येकालाच नोक-या देणे हे पुढे जाऊन सरकारलाही शक्य होणार नाही आणि लोकांनीसुद्धा केवळ शासकीय नोकरी मिळेल, या भ्रमात राहू नये. रोजगार देणे ही केवळ सरकारची जबाबदारी नाही तर युवकांनी स्वत:हून व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार उभारण्याची गरज आहे. यावेळी केंद्र शासनाच्या वतीने ७१ हजार युवकांना रोजगाराची संधी देऊन मोदी सरकारने उचललेले पाऊल अभिनंदनास पात्र आहे.

९९२२९९९५८८