अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून भंगार बाजारावर हातोडा

तरुण भारत लाईव्ह।०८ फेब्रुवारी २०२३।  शहरातील भंगार बाजारातील रस्त्यावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मंगळवारी हातोडा मारला. अजिंठा चौफुलीवरील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आल्याने अतिक्रमणधारकांवर जरब बसणार आहे. एसटी वर्कशॉप येथून अजिंठा चौफुली तसेच महामार्गाच्या चारही बाजूच्या अतिक्रमणात असलेल्या ८५ टपर्‍या हटविण्यात आल्या.

पोलीस बंदोबंस्तात राबविली मोहीमपोलीस बंदोबस्तात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे शहरातील अजिंठा चौक परिसरातील अतिक्रमणात असलेल्या टपर्‍या हटविण्यात आल्या. यावेळी आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्या उपस्थितीत अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. पथकाने कारवाई केल्याने या रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. परिणामी अजिंठा चौकाच्या चारही बाजूंनी वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिवसभर चित्र पाहायला मिळाले. बर्‍याच दिवसांपासून महापालिका प्रशासनातर्फे अतिक्रमण हटविण्याबाबत सूचित केले होते. परंतु त्यात मुहूर्त लागत नव्हता. अखेर महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने सकाळी दहापासून धडक कारवाई करीत अतिक्रमणातील ८५ टपर्‍यासह विक्रेत्यांच्या हातगाड्याही जप्त केल्या. ही कारवाई अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक नारायण नस्ते, संजय ठाकूर यांच्यासह पथकाने केली. मोठ्या पोलीस बंदोबस्तात अजिंठा चौकपासून एस.टी.वर्क शॉप दरम्यान तसेच महामार्गावरील दोन्ही बाजूचे अतिक्रमण हटविल्याने या रस्त्यांनी मोकळा श्‍वास घेतला.

शहरातील अजिंठा चौफुलीजवळील भंगार बाजार, कब्रस्तान दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण वाढले होते. या अतिक्रमण कारवाई दरम्यान लोकप्रतिनीधी इबा पटेल यांनी यावेळी अतिक्रमण कारवाईसाठी मदत करीत नागरिकांना अतिक्रमण काढण्यासाठी समजूत घालत प्रशासनास सहकार्य केले

महापालिकेत गेेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला आयुक्त पदाचा तिढा सुटल्याने तब्बल दोन महिन्यांनंतर महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. त्यामुळे रस्ता मोकळा होऊन रहदारीचा अडथळा दूर होण्यास मदत झाली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी अतिक्रमण मोहीम सातत्याने राबविण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
या कारवाई दरम्यान अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी आणि अतिक्रमणधारक यांच्यात बहुतांश ठिकाणी वाद झाले. दोन ठिकाणी वाद विकोपाला गेल्याने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.